बळजबरी बलात्‍कार,अवघ्‍या काही तासात खुलताबाद पोलिसांनी तरुणाच्‍या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद,३जुलै /प्रतिनिधी:-
मिस कॉल वरुन मैत्री केल्यानंतर अवघ्‍या १५ दिवसात प्रेमाच्‍या आणाभाका  घेत अल्पवयीन पीडितेला खुलताबादला नेत तिच्‍यावर बळजबरी बलात्‍कार करण्‍यात आल्याची घटना शुक्रवारी दि.२ जुलै रोजी घडली. गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर अवघ्‍या काही तासात खुलताबाद पोलिसांनी तरुणाच्‍या मुसक्या आवळल्या.मनोज सुनिल सतुके (२१, रा. दहेगांव ता. कन्‍नड) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एम. सुंदाळे यांनी शनिवारी दि.३ जुलै दिले.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. १५ दिवसांपूर्वी पीडितेच्‍या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरुन मिस कॉल होता. त्‍यामुळे पीडितेने त्‍या क्रमांकवर फोन केला व क्रमांक कोणाचा आहे अशी विचारणा केली. त्‍यावर त्‍याने आपले नाव मनोज सांगत पीडितेच्‍या आवाजाची प्रशंसा केली. व मैत्री करण्‍याबाबत विनंती केली. तेव्‍हा पीडितेने त्‍याला होकार दर्शविला. त्‍यानंतर ते दररोज एकमेकांना फोन करु लागले. १ जुलै रोजी त्‍याने पीडितेला आय लव यू चा मॅसेज केला. त्‍याला पीडितेने होकार दिला. रात्री आठ वाजेच्‍या सुमारास आरोपीने पीडितेला फोन करुन आपण उद्या म्हैसमाळला फिरायला जावू, तु सकाळी बाबा पेट्रोलपंपावर ये मी घ्‍यायला येतो असे सांगितले.

२ जुलै रोजी पीडिता ठरल्याप्रमाणे सकाळी ११ वाजता पेट्रोलपंपा जवळील चौकात गेली. आरोपीने तिला दुचाकीवर बसवुन खुलताबाद येथे नेले. तेथे एका हॉटेलवर जेवण केल्यानंतर आरोपीने पीडितेला हॉटेलच्‍या रुम मध्‍ये नेत तिच्‍यावर बळजबरी बलात्‍कार केला. त्‍यानंतर आरोपीने पीडितेला बाबा पेट्रोलपंप चौकात आणुन सोडले व याबाबत कोणाला काही सांगु नको, अन्यथा अजुन काही तरी करेल अशी धमकी दिली. या प्रकरणात खुलताबाद पोलीस ठाण्‍यात ऍट्रॉसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, अतिरिक्त जिल्‍हा सरकारी वकील शिवाजी निंबाळकर यांनी आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेले कपडे व दुचाकी जप्‍त करणे आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.