निजामाचा वंशज असल्याची थाप,जमीन विक्री करुन शिक्षकाला २५ लाखांचा गंडा

औरंगाबाद,१९ जून/प्रतिनिधी:-

निजामाचा वंशज असल्याची थाप मारत फळ संशोधन केंद्राची जमीन विक्री करुन शिक्षकाला २५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तोतया निजामाच्‍या वशंजाला शनिवारी दि.१९ बेड्या ठोकल्या. दिलशाद जहा ईमदाद जहा (५७, रा. तेजा कॉलनी, लक्ष्‍मी नगर, अलकापुर हैदराबाद ह.मु. हडको कॉर्नर औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले.

या प्रकरणी मोहम्मद नदीम सलीम पाशा (४६, रा. भडकल गेट) यांनी फिर्याद दिली.  मोहम्मद नदीम हे शिक्षक आहेत. दिलशाद जहा याची ओळख हैदराबादचे नातेवाईकाच्या माध्यमातुन झाली होती. दिलशाद याने हिमायत बाग येथे चारशे एकर जमीन आहे. त्याच्यावर जमीर पटेल नावाच्या व्यक्तीने कब्जा केल्याचे दिलशाद याने सांगितले. यानंतर दिलशाद जहा याने त्याच्या मालकीबाबतचे सर्व कागदपत्रे नदीम पाशा याच्या मोबाईलवर व्हॉटसअपवर शेअर केले. यात भारताचे राष्ट्रपती व गृह सचिव व्यवहार यांचे कागदपत्रे समाविष्ट केलेली होती. यात निजामाचे सहा कायदेशीर वारस असल्याचाही उल्लेख होता.

यानंतर दिलशाद याने वेळोवेळी अडचणी सांगून नदीम पाशा याच्याकडून पैसे घेतले. आधी दहा लाख रूपये घेतल्यानंतर त्याने पैसे परत करण्याऐवजी हिमायत बागेतील एक एकर जागा २५ लाखात देण्याचे सांगितले. नदीम पाशा याने १५ लाख रूपये दिले. शिवाय अन्य विक्री करण्यातही मदत केली. आधी जमिनीचे संरक्षक म्हणुन नियुक्त केले. तर दुसऱ्यावेळी ज्या लोकांना जमीन दिली आहे. नदीम पाशा याचा विश्वास बसावा म्हणुन कोर्टात जमिनीची नोटरी करून दिली.

दिलशाद जहा हा फसवणूक करणारा आहे. असे कळाल्यानंतर नदीम पाशा याने दिलशाद जहां याला निजाम वारसदाराबाबत कागदपत्रे मागितली असता, त्याने दिली नाही. यामुळे दिलशाद याने दिलेली जमीनीबाबत अधिक शोध घेतला असता, ही जमीन सव्हे नंबर १०४ ही जमीन फळ संशोधन केंद्राची असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी दिलशाद जहा याला संपर्क केला असता, त्याने कॉन्ट्रॅक्ट किलरच्या माध्यमातुन जीव घेईल अशी धमकी दिली. तसेच एका रिक्षा चालकाच्या माध्यमातुन खोट्या तक्रारीत अडकविण्याचीही धमकी दिली.या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अतिक्रमणाची कारवाई ,सत्य आले समोर

महानगर पालिकेने काही दिवसांपूर्वी हिमायत बाग जवळील एका जमिनीवरील अतिक्रमण हटविले होते. अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर नदिम पाशा यांने त्याला विकलेली जमिनीचा शोध घेतल्यानंतर त्याच्या सोबत फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीला २१ जूनपर्यंत कोठडी

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी आरोपीने फिर्यादीस हिमायत बाग येथील बाग,फळ संशोधन केंद्राची काही जामीन २५ लाख रुपयात विक्री करुन त्‍याची नोटरी करुन दिलेली आहे. ते पैसे जप्‍त करणे आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत याचा तपास करणे आहे. गुन्‍ह्यात आरोपीला कोणी मतद केली काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.