खामनदी विकास कामात नागरिकांची लोक चळवळ उभी राहावी-निखिल गुप्ता

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केली खाम नदी विकास कामाची पाहणी

औरंगाबाद,१९ जून /प्रतिनिधी :- 
ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवनाचे काम कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच महिन्यांपासून विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या अनुभवी व्यक्ती व युवकांना सोबत घेऊन खाम नदी विकासाचे काम सुरू आहे. झालेला विकास हा त्याचाच एक चांगला परिणाम आहे. या विकास कामाचा आनंद होत असून या कामाबद्दल पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी कौतुक केले.या कामात नागरिकांनी सहभागी होऊन नदीचा विकास करण्यासाठी नागरिकांची लोकचळवळ म्हणून उभी रहावी ,असे आवाहन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी आज शनिवारी केले .


ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत खाम नदी रुंदीकरण, खोलीकरण, मजबुतीकरण, पर्यावरण व सौंदर्यीकरणाचे काम गेल्या पाच महिन्यापासून सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या समावेत आज शनिवारी खाम नदीला भेट देऊन विविध विकास कामाची सहा किलोमीटर पायी फिरून पाहणी केली.कामाची पाहणी करून पोलीस आयुक्त गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी खाम नदी विकास कामासाठी महानगरपालिका, स्मार्ट सिटी, छावणी परिषद, व्हॅरॅक कंपनी, इको सत्व, सीआयआय, एएससीडीसीएल, स्वयंसेवी, संघटनांच्या अनुभवी व्यक्तींना व युवकांना सहभागी करून घेऊन झालेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले. यावेळी आयुक्त निखील गुप्ता व ठाणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

खामनदीच्या उगमापासून संगमापर्यंत तसेच विविध विकास कामाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. तसेच साप व सापाच्या जाती, विषारी,बिनविषारी सापाबद्दल आणि पर्यावरण राखण्यासाठी सापाचे किती महत्त्व आहे .याची माहिती सर्पमित्र श्रीकांत वाहुळे व संतोष पवार यांनी दिली.

या कामाची पाहणी केल्यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले की, खाम नदीच्या पुनरुज्जीवन विकास कामाची पाहणी करण्याची,अनुभव घेण्याची संधी आज मला मिळाली आहे. या कामाबद्दल सांगतांना मला अत्यंत आनंद होत आहे. अतिशय चांगले काम आपल्या शहरात होत आहे .आपले शहर एका नदीच्या काठावर जुन्या काळी स्थापित झाले होते. मात्र आजच्या मॉडर्न टाईम मध्ये लोकांना आपल्या शहरात नदी आहे याची माहिती नसेल, अत्यंत सुंदर असा परिसर खामनदीकाठावर तयार होत आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की ,सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन खाम नदीचा विकास हा नागरिकांची चळवळ म्हणून उभी राहिली तर खूप लवकर नदीचे पुनर्जीवन होईलच पण संपूर्ण नदीकाठाचे सौंदर्यीकरण होईल. आपल्या शहराच्या नागरिकांना आपल्या मुलांना नेचर बद्दल माहिती घेण्याचे, विरंगुळा, लाइफ, पिकनिक आणि शहरीकरण, ध्वनी प्रदूषण, प्रदूषण यामधून थोडसे बाहेर निघून नेचर सोबत राहण्याची संधी मिळेल या कामाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत हे काम असेच सुरू राहिले सर्व नागरिकांनी या विकास कामांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करून त्यांनी समाधान व्यक्त केले व कामाबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांना धन्यवाद दिले.

यावेळी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी, स्नेहा बक्षी, स्नेहा नायर, अर्पिता शरद, इको सत्व च्या नताशा झरिन, मनपा शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक व जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार,वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान, उद्यान कनिष्ठ अभियंता तौकीर अहमद, विशाल खरात बाबू जाधव, लाईफ केअर अनिमल वेल्फेअर असोसिएशनचे व वेलकम इंडिया आदर्श पर्यावरण चिकलठाणा,जयेश शिंदे, उदय रगडे ,मंगेश पवार ,अजय कुमार, अझर पठाण, शेख मतीन, तृतीय पंथीय चे प्रतिनिधी अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.