बनावट कागदपत्राच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप,आणखी एका आरोपीला अटक

औरंगाबाद,१८जून /प्रतिनिधी :-

आरटीओ कार्यालयाने रिक्षा स्क्रॅप (भंगार) करण्याची परवानगी दिल्यावर बनावट कागदपत्राच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल सादर करून आरटीओ कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी दि.१८ पहाटे आणखी एकाला अटक केली.

आरोपी शेख कासिम शेख चॉंद (४६, रा. संजयनगर, जिन्‍सी) असे आरोपीचे नाव असून त्‍याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी दिले.

प्रकरणात प्रादेशीक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक रविंद्र दत्तात्रय नारळे (36) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल (रा.मकसुद कॉलनी, रोशनगेट) व त्याच्या साथीदारांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्‍ह्याचा तपासा दरम्यान गुन्‍ह्यातील रिक्षा (क्रं. एमएच-२०-बीटी-६४२०) आरोपी मिर्झा बेग आणि रिक्षा मालक शेख कमरोद्दीन यांच्‍या सांगण्‍यावरुन रिक्षाचा बनावट स्क्रॅप अहवाल तयार करुन रिक्षा स्क्रॅप दाखविण्‍यात आली. मात्र सदरील रिक्षा शेख कासिम याच्‍या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिंसानी मिळालेल्‍या माहिती आधारे जिन्‍सी परिसरात आरोपीला बेड्या ठोकल्‍या आणि रिक्षा देखील जप्‍त केली.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत याचा तपास करणे आहे. गुन्‍ह्याच्‍या तपासादरम्यान ३२ रिक्षांचा बनवाट स्‍क्रॅप अहवाल जप्‍त करण्‍यात आले आहेत, त्‍यापैकी आरोपीच्‍या ताब्यात किती रिक्षा आहेत याचा तपास बाकी आहे. तसेच आरोपी रिक्षा स्‍क्रॅप न करता त्‍याचा इतर गुन्‍ह्यासाठी वापर करतो का याचा आणि जप्‍त केलेल्या रिक्षाचा चेसीस व इंग्जिन क्रमांक आरोपीने बदलला असून त्‍याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.