अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

परभणी,१८जून /प्रतिनिधी :- अल्पसंख्यांक समुदायाचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेस खासदार फौजिया खान, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अल्पसंख्याक विभागाच्या सेवानिवृत्त सहसचिव श्रीमती अैनूल अत्तार, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे उपस्थित होते. सर्व संबधित विभागांना नवीन 15 कलमी कार्यक्रमाची माहिती होण्याकरीता आज या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अल्पसंख्यांक समुदायाच्या कल्याणकारी विविध कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हयात अल्पसंख्याक कल्याण विकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत प्रस्ताव सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सांगितले.  अल्पसंख्यांक समुदायाला विकासाच्या प्रवाहात आणल्यास शांतता व स्थैर्य त्यांच्यात येईल.  संबंधित अधिकाऱ्यांनी मनापासून कटिबद्ध होऊन काम करावे असे त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी असलेल्या या 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन परभणी जिल्हा पथदर्शी ठरेल असा विश्वास खासदार फौजिया खान यांनी व्यक्त केला. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, अल्पसंख्याक समुदायामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौध्द पारशी, जैन या समुदायाचा समावेश होतो. त्यात मुस्लिम समाज शिक्षणात मागास आहे. अल्पसंख्याक समुदायाचा विकास करण्याकरीता त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करणे, त्यांना आर्थिक कार्यक्रमांमध्ये आणि सेवा योजनामध्ये न्याय वाटा उपलबध करुन देणे हे अधिक महत्त्वाचे आणि गरजेचे आहे असे खासदार फौजिया खान म्हणाल्या.

या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कअधिकारी शिवानंद टाकसाळे, सेवानिवृत्त सहसचिव, अल्पसंख्याक विभाग, मंत्रालय मुंबई श्रीमती अैनूल अत्तार, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे यांनी मार्गदर्शन केले. तर शेवटी आभार  उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. संजय कुंडेटकर यांनी मानले.