परभणीत एक हजार नव्या बेडची व्यवस्था – नवाब मलिक

परभणी,२२एप्रिल /प्रतिनिधी 

परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. एका दिवसात एक हजार आणि एकदा तर बाराशे रुग्ण आढळून आले. दररोज साधारणतः सहाशे रुग्ण सरासरी आढळून येत आहेत. तसेच भविष्यातील परिस्थिती पाहता, परभणी शहरातील कल्याण मंडपम येथे 500 खाटांचे नवीन जम्बो कोरोना हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या प्रमाणेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 50 खाटा असलेले कोरोना हॉस्पिटल देखील उभारण्यात येणार असून, एकूणच जिल्ह्यासाठी एक हजार नवीन बेडची व्यवस्था येत्या आठ ते दहा दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Displaying IMG-20210422-WA0017.jpg

     कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक हे आज गुरुवारी, 22 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी शासकीय रुग्णालय, आयटीआय कोरोना रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार यांची उपस्थिती होती.   

Displaying IMG-20210422-WA0023.jpg

पुढे बोलताना मलिक म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना बधितांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, म्हणून 500 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर जनरेशनचे दोन प्लांट आपण उभारले आहोत. याच बरोबर आठ तालुक्यांमध्ये मिनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहोत. या माध्यमातून देखील दररोज 300 जम्बो सिलेंडरची क्षमता निर्माण होणार आहे. एकूण जिल्ह्यात तेराशे जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती केली जाणार आहे. याचबरोबर 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अर्थात छोटी युनिट खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तसेच कर्नाटक मधील भिलारी नावाच्या जिल्ह्यातून आपल्याला दररोज 20 केएल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असल्याचे देखील नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्याला सात एजन्सीच्या माध्यमातून रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा होत असतो. आज गुरुवारीच राज्य शासनाच्या माध्यमातून रेमडीसिवर इंजेक्शनचा मोठा साठा जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात या इंजेक्शनची कुठलीही अडचण राहणार नाही. मात्र, किती साठा उपलब्ध होणार आहे, याचा आकडा मी देत नाही. कारण तसे कळाल्यास प्रत्येक माणूस इंजेक्शन मागायला निघेल. परंतु जी गरज आहे, तेवढे इंजेक्शन उपलब्ध होणार असून, येणाऱ्या काळात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शन यापैकी कुठलीही कमतरता राहणार नसल्याचे ते म्हणाले.     

Displaying IMG-20210422-WA0014.jpg

दरम्यान, केंद्र सरकारने 45 वर्षाच्या आतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत जबाबदारी झटकली, असा  आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच ‘महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार जगातील चांगली आणि स्वस्त लस उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. मग ती लस फायझरची असेल किंवा आणखीन कुठली असेल, याबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार समिती नेमणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार जगातील सर्वात चांगली आणि स्वस्त लस खरेदी करून राज्यातील जनतेला देण्याबाबत विचार करत आहे, अशी माहिती सुद्धा नवाब मलिक यांनी शेवटी दिली.