रोजगाराभिमुख व्यवसायांचा आराखड्यात समावेश करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :- दळणवळणाच्यादृष्टीने उत्तम जोडणी असलेला औरंगाबाद जिल्हा आहे. जागतिक वारसा स्थळे अजिंठा, वेरूळ येथे आहेत. पर्यटन क्षेत्रातही जिल्हा समृद्ध आहे. या जिल्ह्यातील प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे, त्यासाठी कौशल्य विकास आराखड्यात रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रमांचा अंतर्भाव करून बेरोजगारांना प्रशिक्षित करावे. त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.

May be an image of 12 people, people sitting and people standing

            जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी  समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.बी.दंदे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राच्या  वरिष्ठ शास्त्रज्ञ गीता यादव, मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या  जिल्हा व्यवस्थापक एस.आर. जवंजाळ, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समन्वयक  कमलाकर कदम, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक समाधान सूर्यवंशी, मॅजिकचे आशीष गर्दे, अटल इन्क्यूबेशन सेंटरचे अमित रंजन, अंकूर जेका इन्क्यूबेशन सेंटरचे श्रीमती एस.एस.अग्रवाल,  डॉ. शिल्पा काबरा, प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे स्वप्नील अन्नदाते, इंडो जर्मन टूलचे व्ही.एम.बनकर, फॅबी कार्पोरेशनचे फहाद सय्यद, खाना एनीव्हेअरचे प्रतिनिधी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे आदींची उपस्थिती होती. 

May be an image of 1 person, sitting and indoor

            जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील तरूण वर्गाला सध्याच्या काळाची गरज ओळखून रोजगारविषयक प्रशिक्षण द्यावे. जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची भरपूर क्षमता आहे. त्यासाठी कौशल्य विकासावर भर द्यावा लागेल. कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. कौशल्य विकास विभागाने पॅकेजिंग, मार्केटिंग या क्षेत्रातही रोजगार मिळवून देण्यासाठी जागृती निर्माण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

            राज्यस्तरावरील कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, संकल्प योजनेंर्तगत पीएसए कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने कौशल्य विकास विभागाशी समन्वय ठेऊन आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हास्तरावरील सन 2022-23 च्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणास तांत्रिक मान्यता, जिल्हा कौशल्य विकास कृती आराखड्यात विविध नवनवीन रोजगाराभिमूख अभ्यासक्रमांना मान्यताही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली.

            नव्याने समाविष्ट् करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये समितीच्या सर्व सदस्यांनी रोजगाराभिमूख मनुष्यबळ तयार होईल, यासाठी पुढे येण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी सदस्यांना केले. त्याचबरोबर शासनाच्या नवीन निर्णयानुसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती पुनर्गठीत करण्यासही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मान्यता दिली. बैठकीत विविध  विषयांचे सादरीकरण श्री. वराडे यांनी केले. समिती सदस्यांनीही सूचना मांडल्या. त्या सूचनांचे स्वागत करत सूचनांचा अंतर्भाव नवीन कौशल्य विकास आराखड्यात करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधितांना दिले.