रुग्णांच्या प्रमाणात म्युकरमायकोसिस इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२६ मे /प्रतिनिधी :- जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना आवश्यक तेवढे इंजेक्शन मिळणे गरजेचे आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात इंजेक्शन उपलबध होणार असल्याने संबंधित शासकीय संकेतस्थळावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती नियमितपणे अपडेट ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज संबंधितांना दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात काल (दि.25) रात्री म्युकरमायकोसिस बाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा परीषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, औषध प्रशासनचे राजगोपाल बजाज, डॉ. लढ्ढा आदी उपस्थित होते.

             पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, रुग्णांची माहिती www.covid19.nhp.gov.in या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत होणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारावरच शासनाकडून आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा होणार असल्याने ही माहिती अद्ययावत करण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ महापालिकेला उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनाकडून नियमितपणे इंजेक्शन प्राप्त होण्यासाठी संबंधित यंत्रणेच्या संपर्कात राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

             बैठकीच्या सुरूवातीला डॉ. निता पाडळकर आणि डॉ. उल्हास गंडाळ यांनी म्युकरमायकोसिस आजाराबाबतची सद्यस्थिती जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली.