शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांच्या आरोग्याचे हित जपले जाईल; कोणतीही उणीव भासू देणार नाही 

मुंबई, २८जून /प्रतिनिधी :-तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण आज मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.

पुढच्यास ठेच, मागचा शहाणा

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस् रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल.

पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दररोज 15 लाख लसी देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.प्रारंभी महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले.