विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सिंधुदुर्गला औरंगाबादहून साडेसहाशे खांब

औरंगाबाद,२० मे / प्रतिनिधी :-  तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्कळीत झालेला विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलातर्फे 650 लोखंडी खांब पाठवण्यात आले आहेत.  

वादळाच्या तडाख्याने कोकणातील हजारो वीजखांब, रोहित्रे आणि शेकडो किलोमीटरपर्यंतच्या वीजवाहिन्या कोलमडल्या आहेत. विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी एका बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील विद्युतपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते, संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकणातील वीज यंत्रणेतील दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यासाठी मनुष्यबळ तसेच साहित्य पुरविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी बैठकीत दिले. त्यांच्या निर्देशानुसार विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी जवळच्या जिल्ह्यातील महावितरणचे कर्मचारी कोकणात रवाना झाले आहेत. तर इतर ठिकाणांहून आवश्यक सामग्री पाठवण्यात येत आहे.   

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते व मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी औरंगाबाद परिमंडलातून 650 लोखंडी खांब सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी दोन ट्रेलरमध्ये रवाना केले. यावेळी सामग्री नेणाऱ्या कर्मचाऱ्यांस त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता दीपक सोनोने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कीर्तिचंद्र काळे उपस्थित होते.