मराठा आरक्षण:आता तरी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा-आ.सतीश चव्हाण

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी- 

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केल्याने मराठा समाजावर फार मोठा अन्याय झाला आहे. खरे तर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी आपली बाजू भक्कमपणे मांडली. केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न शेड्युल 9 मध्ये टाकला असता तर मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असते. 3 मार्च 2021 रोजी विधान परिषदेत देखील मी हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे माझी तमाम महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने केंद्र सरकारला विशेषत: पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना विनंती आहे की, 102 व्या घटनादुरूस्तीनंतर सर्व अधिकार केंद्र सरकारला असल्यामुळे मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच माझी मराठा समाजातील तरूणांना देखील हात जोडून विनंती आहे की, कोरोनाच्या संकट काळात आपला जीव महत्वाचा आहे. त्यामुळे आपण संयम बाळगावा असे आवाहन चव्हाण यांनी केले.