पंडित नाथराव नेरळकर यांनी संगीताचा समृद्ध वारसा दिला— मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख

मुंबई दि 28: पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

देशातील विविध नामवंत पुरस्काराने गौरविलेल्या नाथरावांनी मराठवाड्यात संगीत प्रसाराचे केलेले काम कधीही विसरता येणार नाही. त्यांनी घडविलेले शिष्य त्यांच्या गायन आणि संगीताचा समृद्ध वारसा पुढेही चालवीत राहतील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पंडित नेरळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठवाड्यामधील संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि.२८ : मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक तथा शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावसंगीतकार पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाने मराठवाड्यामधील संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला, या शब्दात ज्येष्ठ गायक पंडित नाथराव नेरळकर  यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मंत्री श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अनेक शिष्य घडविणारे संगीत गुरू अशी पंडित नाथराव नेरळकर यांची ओळख होती. नाथराव नेरळकरांना ‘श्रेष्ठ गायक-अभिनेता’ पुरस्कार , ‘कलादान’ पुरस्कार , ‘उत्कृष्टता’ पुरस्कार , ‘औरंगाबाद भूषण’, ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा पुरस्कार  तसेच २०१४ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कार/ सन्मानांनी गौरविण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळवणारे नाथराव हे मराठवाड्यातील पहिलेच कलावंत होत. नाथरावांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. नाथराव नेरळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

गुंजकरांची    परंपरा चालविली 
शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात मराठवाड्याचे नाव सन्मानाने घेतले जावे असे भक्कम योगदान देणाऱ्या आण्णासाहेब गुंजकरांची त्याच योग्यतेने परंपरा चालवणारे नाथराव नेरळकर आपल्याला सोडून गेले. त्यांचे आत्म्यास सद्गती लाभावी   त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी ही प्रार्थना. सरस्वतीभुवन परिवारातर्फे नेरळकर परिवार व शिष्यगणां प्रती सहसंवेदना.
राम भोगले ,अध्यक्ष ,स. भु.शिक्षण संस्था

शास्त्रीय संगीत क्षेत्राची हानी

शास्त्रीय संगीतातील पितामह आदरणीय नाथराव नेरळकर गुरुजी यांच दुःखद निधन म्हणजे संगीत क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालीआहे. गुरुजी संगीत क्षेत्रात तर ते पितामह होतेच पण एक माणूस म्हणून पण आदरणीय होते, संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी बद्दल राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. गुरुजींच्या जाण्यानं नेरळकर परिवार सह संगीत क्षेत्र पोरकं झालं आहे. मराठवाड्याचा तेजोमय सूर्य अस्ताला गेल्याची भावना आहे, बडा ख्याल थांबला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. नेरळकर कुटुंबीयांना हा खूप मोठा आघात सहन करण्याची शक्ति देवो ही प्रार्थना.

खासदार इम्तियाज जलील, औरंगाबाद

————–​

शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी ​ आयुष्य पणाला ​​​
भारतीय शास्त्रीय संगीतातील मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक, संगीतकार उत्तम गुरु तथा सरस्वती भुवन महाविद्यालयाचे माजी संगीत विभाग विभाग प्रमुख पंडित नाथराव नेरळकर गुरुजी यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताची अपरिमित अशी हानी झालेली आहे, शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी पंडित नाथराव नेरळकर गुरुजी यांनी संपूर्ण ​आयुष्य पणाला ​लावले,
 आम्ही आमचे भाग्य समजतो गुरुवर्य पंडित नाथराव नेरळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे अध्ययन आम्हास करण्याचे भाग्य लाभले, शास्त्रीय संगीता सोबतच मराठी गझल, भक्तीगीते पंडित गुरुजींनी संगीतबद्ध तथा गाऊन अजरामर केली, भारत भरातील अनेक जेष्ठ श्रेष्ठ कलावंतांना मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मैफली घडवून आणण्याचे कार्य देखील पंडित नाथराव नेरळकर गुरुजींनी केले, ज्यांच्या नावात नाथ होता असे नाथराव नेरळकर गुरुजी मात्र संगीत क्षेत्राला अनाथ करून गेले असेच म्हणावे लागेल,
पांडुरंग परमात्मा जवळ आम्ही असी विनम्र प्रार्थना करतो गुरुजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना,
राम विधाते, बजरंग विधाते, (विधाते बंधु) 

 ———-
  नाथराव नेरळकर म्हणजे संगीताचा चालतं बोलतं विद्यापीठ  
पंडित नाथराव नेरळकर म्हणजे संगीताचा चालतं बोलतं विद्यापीठ होतं. अण्णासाहेब गुंजकर यांचे ते शिष्य. नांदेड हुन त्यांना येथे आणले ते दिवंगत अनंत भालेराव यांनी. दोन वर्षापूर्वी मला मोठ्या वैद्य यांच्या नावाने असलेला पुरस्कार त्यांच्या हस्तेच मिळाला होता. नाथराव यांच्यामुळेच मला पंडित भीमसेन जोशी यांची मुलाखत मिळाली होती. संगीताची मैफल आणि पान हे दोन्ही ते अतिशय सहजपणे रंगवीत असत. ऐंशीच्या दशकात त्यांनी नादब्रह्म तर्फे घडविलेल्या संगीत संमेलनात देश पातळीवरील नामवंत गायक व वादक यांना ऐकण्याची संधी औरंगाबादकरांना मिळाली होती.नाथराव गझल ही अतिशय उत्तम गात असत. आता मात्र सारे सुनेसुने झाले आहे.
अरविंद वैद्य ,ज्येष्ठ संपादक 

—————

 नाथरावांच्या सान्निध्यात राहून गेलेले यशवंत देव म्हणतात-
” जिथे शब्द सुरांच्या सांगाती जातात आणि सुर त्यांची अखंड सोबत करतात
जिथे साक्षात संगीतच गाऊ लागतं आणि शब्द होवून जातात सुर ते स्थान म्हणजे नेरळकरांचे घर..

————- 

रंगलेली मैफल आता सुनी सुनी  
गुरूवर्य गान महर्षि डाॅ अण्णासाहेब गुंजकर यांनी नाथरावांच्या गायन कलेला पैलु पाडले.संगीतासाठी नाथरावांनी आयुष्य वेचलं,साधना केली.ध्येयनिष्ठा जपली.मराठवाड्यात संगीत रूजावं,कानसेन आणि तानसेन तयार व्हावेत,मराठवाडा देशाच्या नकाशावर ठळक दिसावा,मागासलेपणाचं  बिरूद नाहीसं व्हावं,या साठी  नाथरावांनी अथक परिश्रम घेतले.त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
विविध निमित्ताने नाथरावांना भेटता आले,संगीताची मैफल सुरेल स्वरांनी  ते तर रंगवत असतच.पण त्यांनी गप्पांच्या किती तरी मैफली आठवणी आणि किस्स्यांनी रंगवल्या आहेत.प्रदीर्घ काळाचा हा सुरेल प्रवास,रंगलेली मैफल आता सुनी सुनी वाटत आहे.एका स्वरयात्रीचे चिरंतनाच्या प्रवासाला जाणे क्लेशकारक आहे.
प्रशांत गौतम ,साहित्यिक व  पत्रकार 

————— 

लई नाही,लई नाही मागणं’   
सूरमणी बासरीवादक दत्ता चौगुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या हंगरगा(नळ),ता.तुळजापूर या जन्मगावी आयोजित संगीत मैफिलीसाठी औरंगाबादहून पं.नाथराव नेरळकर आणि हेमा उपासनी यांच्यासमवेत मलाही जाण्याचा योग आला. ग्रामीण भागातून बैलगाड्या करुन ही मैफल ऐकायला लोकं आली होती.’लई नाही,लई नाही मागणं’ या भैरवीनं नाथराव गुरुजींनी या मैफलीचा समारोप केला.ती मैफल हंगरगेकर आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या आजही लक्षात आहे.ती भैरवी अजूनही कानात घुमते आहे.गुरुजी जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा ‘ काय ससो’ असं सहज म्हणत स्नेहाचा वर्षाव करीत.’गुरव समाजातील उपेक्षित कलावंत’ या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं होतं.वरद गणेश मंगल कार्यालयात त्यादिवशी गुरुजींनी त्यांचे संगीत क्षेत्रातील गुरू पं.अण्णासाहेब गुंजकर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.नोव्हेंबर महिन्यात मी त्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटलो.गप्पागोष्टी, चर्चा झाल्या.हंगरग्याच्या त्या मैफलीची आठवण त्यांना झाली.हंगरग्याला राहणारे प्रकाश चौगुले या दत्ता चौगुले यांचा उल्लेख निघाला.लगेच मोबाईलवर गुरुजी त्यांच्याशी बोलले.हा कौटुंबिक जिव्हाळा लाखमोलाचा..गुरुजींचं संगीत क्षेत्रातील कार्य अजोड.अनेक पिढ्यांना त्यांचं कार्य प्रेरणा देत राहील.त्या अर्थानं ते जिवंतच राहतील,यात शंका नाही
स सो खंडाळकर,ज्येष्ठ पत्रकार