समाजाकडे बघण्याचा, समाजाला जाणून घेण्याचा, समाजाचे सामर्थ्य ओळखण्याचा एक अद्भुत अनुभव: पंतप्रधान

“मन की बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला देशवासियांशी संवाद

नवी दिल्ली,२८ मार्च २०२१:

मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोलता आले , त्यांच्या विलक्षण कामांबद्दल जाणून घेताना  लक्षात आले की देशाच्या दूरदूरच्या कोपऱ्यातही किती अभूतपूर्व क्षमता दडलेली आहे! भारत मातेच्या कुशीत किती प्रकारची  रत्ने घडत आहेत! हा समाजाकडे बघण्याचा, समाजाला जाणून घेण्याचा, समाजाचे सामर्थ्य ओळखण्याचा एक अद्भुत अनुभव होता अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 75 भागात या  महत्वपूर्ण टप्प्याबद्द्ल आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘मायगव्ह’ या संकेतस्थळावर , आर्यन श्री, बंगलोर येथील अनुप राव, नोएडाचे देवेश, ठाणे येथील सुजित या सर्वांनी आजचा भाग 75 वा भाग असल्याचे खूप बारकाईने लक्षात ठेवले आणि तसे आवर्जून कळवले . ‘मन की बात’ शी आपण अशाप्रकारे जोडलेले राहिला आहात. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगत पंतप्रधानांनी  त्यासर्वांचे तसेच ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांचे आभार मानतो.

आतापर्यंतच्या ७५ भागांमध्ये कितीतरी  विषय हाताळता आले असे सांगून त्यांनी मागील 74 भागातील  हाताळलेल्या   नदीची , वाळवंटाची ,हिमालयाच्या शिखरांची गोष्ट, तर कधी नैसर्गिक आपत्तीविषयी , मानवी सेवेच्या असंख्य कथा आणि  तंत्रज्ञानाचा अविष्कार अशा विविधांगी विषयांची आठवण करून दिली.

75 व्या ‘मन की बात’ मध्ये बोलत असताना  हा मार्च  महिना, स्वातंत्र्याची 75- वर्षे, ‘अमृत महोत्सव’ सुरू होणारा महिना असल्याचे आवर्जून आणि अभिमानाने सांगतो असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव सोहळ्याची सुरुवात यंदा  दांडी यात्रेच्या दिवशी झाली असून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यदरम्यान संपूर्ण देशभरात ‘अमृत महोत्सवा शी’ संबंधित विविध आयोजित केले जात असून वेगवेगळ्या ठिकाणाहून या कार्यक्रमांची छायाचित्रे, माहिती लोक शेअर करत आहेत, पाठवत आहेत असे आज पंतप्रधानांनी सांगितले.

यानिमित्त देशाचे नागरिक एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची गाथा ,

एखाद्या महत्वाच्या ठिकाणाचा इतिहास ,देशाची सांस्कृतिक कथा असा अनमोल ठेवा ‘अमृत महोत्सवाच्या’ दरम्यान देशवासियांच्या समोर आणून संपर्क साधन बनू शकता असे आवाहन त्यांनी केले.  अशा उपक्रमामुळे बघता बघता ‘अमृत महोत्सव’ सोहळा अशा अनेक प्रेरणादायक अमृत बिंदूंनी भरून जाईल आणि ती  अमृत धारा आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे झाली तरी प्रेरणा देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवाचा’ अर्थ हाच आहे की आपण  त्यानिमित्त काहीतरी नवीन संकल्प करूया. असे सांगत त्यांनी तो संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तो संकल्प ,समाजाच्या हिताचा, देशाच्या भल्याचा असेल आणि भारताच्या उज्वल भविष्यासाठी असेल, ज्यामध्ये प्रत्येकाची स्वतःची नागरिक म्हणून   काही जबाबदारी आणि  कर्तव्य त्याच्याशी जोडलेले असेल असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मागील वर्षी मार्च महिण्यात जेव्हा कोरोनाचा फैलाव सुरु झाला तेव्हा देशाने ‘जनता कर्फ्यू’ हा शब्द प्रथमच ऐकला होता आणि या महान देशाच्या महान प्रजेच्या सामर्थ्याचा पैलू , ‘जनता कर्फ्यू’ संपूर्ण जगासाठी एक आश्चर्य आणि शिस्तीचे एक अभूतपूर्व उदाहरण होते असे सांगत ते पुढे म्हणाले की ,

गेल्या वर्षी यावेळी, प्रश्न होता की कोरोनाची लस कधी येणार? सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे. लोक त्यांच्या घरातील  वडीलधाऱ्यांचे, लस घेतल्यानंतरचे फोटो ट्विटर-फेसबुकवर अपलोड करीत या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत असे ते म्हणाले.  तरीही ‘दवाई भी – कडाई भी’ ! हा कोरोनाशी लढा देण्याचा मंत्र मात्र नक्की लक्षात ठेवा, असं त्यांनी सांगितले.

भारताची  क्रिकेटर मिताली राज हिने नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करून अशा प्रकारची कामगिरी करणारी ती पहिली  भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे त्याबद्दल  पंतप्रधानांनी तीचे अभिनंदन केले आणि या विषयाकडे लक्ष वेधून त्याचा ‘मन की बात’ मध्ये उल्लेख करावा असे सुचवले

याबद्दल पंतप्रधानांनी इंदूरच्या रहिवासी असलेल्या सौम्या यांचे आभार मानले.

कृषी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी , शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी , पारंपरिक शेतीबरोबरच नवीन पर्याय , नवनवीन संशोधने स्वीकारणे देखील तितकेच आवश्यक आहे , श्वेत क्रांती दरम्यान देशाने याचा अनुभव घेतला आहे असे आज पंतप्रधानांनी सांगितले.

 आता मधमाशी पालन देखील असाच एक पर्याय असून मधमाशी पालन देशात मध किंवा मधुर क्रांतीचा पाया रचत असून शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी होत नवसंशोधन करत आहेत असे सांगत त्यांनी पश्चिम बंगालमधील   दार्जिलिंगइथल्या  गुरदुम या गावाचे , विदेशात प्रसिद्ध असलेल्या   पश्चिम बंगालच्या  सुंदरबन परिसरातील नैसर्गिक सेंद्रिय मधाचे ,गुजरातमधील बनासकांठा इथल्या मधुर क्रांतीचा नवीन अध्याय लिहिनाऱ्या शेतकऱ्यांची उदाहरणं दिली.