‘अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा’, सभेतला रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्विट करत ठाकरे गटाचा खोचक शब्दांत निशाणा

भाजपचे औरंगाबाद लोकसभा लढवणे म्हणजे दंड फुगवून बेडकी आणणेच-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
नड्डांच्या भाषणातील ‘त्या’ शब्दावरून अंबादास दानवेंची भाजपावर टीका!

औरंगाबाद,२ जानेवारी  / प्रतिनिधी :- आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी शेड्डू ठोकलाय. नड्डा यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. पण त्यांच्या औरंगाबादमधील सभेत अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जे पी नड्डा यांच्या सभेचा व्हिडिओल ट्विट केला.

अंबादास दानवे यांनी व्हिडीओ ट्विट करत जे पी नड्डा यांच्यावर खोचक टीका देखील केलीय. “अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा”, अशी टीका दानवेंनी केलीय.

अंबादास दानवेंची भाजपावर टीका!

अंबादास दानवे यांनी जेपी नड्डा यांच्याकडून भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या जागी बाळासाहेब देवरस असा उल्लेख करण्यात आल्याचा मुद्दा उचलला असून, त्यावरून भाजपाला टोला लगावला आहे.नड्डाजी, “यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार! ” असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

“लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.

नुकतेच विधिमंडळाचे अधिवेशन झाले. त्यात आपण काय कामगिरी बजावली याची माहिती देण्यासाठी दानवे यांनी सोमवारी (२ जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. प्रत्येक पक्षाला निवडणुकासाठी त्यांची तयारी करण्याचा अधिकार आहे. मात्र, औरंगाबाद लोकसभा लढण्यासाठी भाजपकडे तगडा उमेदवारच नाही. हा केवळ दंड फुगवून बेडकी आणण्याचा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहासाठी स्थानिक नेत्यांच्या घोषणा आहेत. त्या पलिकडे काहीही नाही, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. 

सत्तारांची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणू
दानवे म्हणाले की, विधिमंडळात कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा भूखंड घोटाळा उघडकीस आल्यानंतर आम्ही आक्रमक भूमिका घेतली होती. सत्तारांच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यातील काही सिल्लोड मतदारसंघातील, तर काही राज्यस्तरीय आहेत. अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही समोर येत असून त्याची माहिती घेऊन लवकरच ती चव्हाट्यावर आणू.

मराठवाड्याच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडली-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मराठवाडयातील पाण्याचा प्रश्न, शेती, पीक विमा, शेतकऱ्यांची आत्महत्या ते कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विविध घोटाळे आदी मराठवाडयातील प्रश्न, समस्यांवर 

विधान परिषदेत आक्रमकपणे भूमिका मांडत मराठवाडयातील जनतेला न्याय मिळावा यासाठी आक्रमकपणे भूमिका मांडल्याची माहिती विधानपरिषद विरोधी पक्षनेते 

अंबादास दानवे यांनी आज त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती लक्षात घेऊन मराठवाड्यातील संभाजीनगर हिंगोली, जालना, धाराशिव आदी जिल्ह्यांसह राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर मुद्दे अधिवेशनात मांडल्याचे ते म्हणाले.यात प्रामुख्याने विधी विद्यापीठला लागणारा १०० कोटी रुपयांचा निधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांनी नाकारून एकप्रकारे मराठवाडयावर अन्याय व अडथळा निर्माण केल्याचा आरोप दानवे यांनी केला. पुरवणी मागण्यांमध्ये या निधीची तरतूद होणे गरजेचे होते असे देखील ते म्हणाले.

फडणवीस सरकारने हाती घेतलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत देखील विचार करायला हवा होता, पाणी वाया न जाता मराठवाडयाला मिळाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या खुलताबाद, वेरूळ येथे मोठया संख्येने पर्यटक येत असतात.या महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या पाहता व येथील पर्यटन स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन या परिसरात ट्रामा केअर सेंटर उभारण्यात यावे.यासाठी’खुलताबाद, वेरूळ येथे ट्रामा केअर सेंटर उभारणीसंबंधी  मागणीही त्यांनी सभागृहात लावून धरली. 

औरंगाबादमध्ये ही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं काम सत्तार यांनी केलं ते सभागृहाच्या निदर्शनास आणले.बेकायदेशीररित्या गायरान जमीनीचे वाटप तसेच रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन बेकायदेशीररित्या विकणे ही सर्व प्रकरणे पुराव्यासह सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती दानवे यांनी दिली.

राज्यात २९ लाख ३८ हजार कामगारांपैकी विदर्भात फक्त २ लाख ३८ हजार कामगार हे कार्यरत आहेत. एकट्या मुंबईत ५३ आयटी पार्क असून संभाजी नगर मध्ये ३ व नागपूरमध्ये ५ असे फक्त ८ आयटी पार्क आहेत. त्यामुळे मराठवाड्यात आयटी पार्क वाढविण्याबाबत सरकारने विचार करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

मराठवाड्यात पायाभूत सुविधा असून औद्योगिक विकास नाही. सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योजकां विषयी विदर्भ आणि मराठवाडा अतिशय मागे आहे. केंद्रात या विभागाचे मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. या विभागाच्या अनेक योजना असून त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आदी मराठवाड्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आवाज उठविला.

सिद्धांत शिरसाट म्हणजे … बडे मियाँ तो बडे मियाँ
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील विषय बाहेर चर्चेला जात असल्याच्या सत्तारांच्या आरोपामुळे शिंदे गटात अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. याविषयी दानवे म्हणाले की, सत्तारच अशा प्रकारच्या चर्चा बाहेर करत असतात. त्यांनाच ती सवय आहे. आमदार संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांच्या मुलाने ठेकेदाराला धमकावल्याच्या प्रकरणावर ‘बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानअल्ला’ एवढीच प्रतिक्रिया दानवेंनी नोंदवली.

आजच्या पत्रकार परिषदेस माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर,अंकुश रंधे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य, तालुकाप्रमुख संजय मोटे, दिनेश मुथा, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप ,संपर्क संघटक सुनिता आऊलवार,सहसंपर्क संघटक सुनिता देव, समन्वयक कला ओझा आदी उपस्थित होते.