20 कोटींहून अधिक चाचण्या करत भारताने अभूतपूर्व विक्रम नोंदविला

सक्रिय रुग्णसंख्या 1.5 लाखांपेक्षा खाली घसरली – 8 महिन्यातील नीचांक
54 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण
50 लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारा भारत सर्वात वेगवान देश

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2021

कोविड- 19 च्या चाचण्यांमध्ये भारताने अभूतपूर्व विक्रम नोंदविले आहेत. एकूण चाचण्यांचा 20 कोटींचा टप्पा (20,06,72,589) आज पार झाला आहे. गेल्या 24 तासात 7,40,794 इतक्या चाचण्या करण्यात आल्या.

चाचणीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्यामुळे देशभरातील चाचणीच्या आकडेवारीत प्रगती झाली आहे. देशभरात एकूण 2369 चाचणी प्रयोगशाळांमध्ये 1214 शासकीय प्रयोगशाळा आणि 1,155 खासगी प्रयोगशाळा आहेत. दैनंदिन चाचणी क्षमतेत भरघोस वाढ झाली आहे. बाधित रुग्णांचा दर देखील कमी होत आहे आणि सध्या तो 5.39 टक्के इतका आहे.

मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या व्यापक चाचणीमुळे देखील राष्ट्रीय स्तरावरचा बाधित रुग्णांचा दर खाली आणला गेला आहे.

दैनंदिन मोठ्या संख्येने होणाऱ्या चाचण्यांमुळे दैनंदिन नव्या रुग्णसंख्येत घट होत गेली आहे, ज्याचा परिणाम म्हणून बाधित रुग्णांचा दरही कमी झाला आहे.

भारतातील सक्रिय रुग्संख्येत सातत्याने घट होत आहे. आज ती 1.5 लाखांपेक्षा कमी (1,48,590) इतकी  खाली आली आहे आणि गेल्या आठ महिन्यांमधील ही सर्वात कमी संख्या आहे.भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येपैकी केवळ 1.37 टक्के इतकी सध्याची सक्रीय रुग्णांची संख्या आहे.गेल्या 24 तासात देशात 100 पेक्षा कमी मृत्यूंची (95) नोंद झाली आहे.

देशभरात सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये 6 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लसीकरण घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या आकड्याने 54 लाखांच्या टप्प्याला (54,16,849) मागे टाकले आहे.दररोज लसीकरण करणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत सातत्याने आणि प्रगतीशील वाढ दिसून आली आहे.कोविड- 19 लसीकरणात 5 दशलक्षांपर्यंत पोहोचणारा भारत हा सर्वात वेगवान देश ठरला आहे. हा पराक्रम केवळ 21 दिवसांमध्ये साध्य होऊ शकला आहे. इतर अनेक देशांमध्ये कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू होऊन 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊन गेले आहेत.

गेल्या 24 तासामध्ये, 4,57,404 लोकांनी 10,502 सत्रांमध्ये लसीकरण करून घेतले. यापूर्वी 1,06,303 लसीकरणाची सत्र झाली आहेत. यामध्ये 3,01,537 आरोग्य कर्मचारी आणि 1,55,867 अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांचा समावेश आहे.

भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येतही घसरण नोंदविली गेली आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.19 टक्के इतका झाला आहे, एकूण 1,05,10,796 इतके लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14,488 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

बरे झालेल्या रुग्णांपैकी 82.07 टक्के रुग्ण हे 6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.एकाच दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची नोंद 6,653 इतकी केरळ मध्ये झाली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 3,573 इतके रुग्ण बरे झाले आहेत, तर त्यानंतर तामिळनाडू मध्ये 506 इतकी नोंद आहे.

नवीन रुग्ण संख्येपैकी 83.3 टक्के रुग्ण हे 6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.केरळमध्ये पुन्हा दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी नोंद 5,610 करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2,628 तर तामिळनाडू मध्ये 489 इतके नवे रुग्ण आढळले आहेत.नवीन मृत्यू पैकी 81.05 टक्के मृत्यू सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूंची (40) नोंद झाली. त्यानंतर केरळमध्ये दैनंदिन मृत्यूसंख्या 19 आणि छत्तीसगडमध्ये 8 मृत्यू झाल्याची नोंद आहे. केवळ 2 राज्यांमध्ये दैनंदिन मृत्यूंची संख्या दोन आकडी आहे.