एक-दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण कार्यालय सील करणं गरजेचं नाही, केवळ निर्जंतुक करा – केंद्र सरकार

नवी दिल्ली, 5 जून 2020

कार्यालयात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलं तर घ्यायची खबरदारीही सरकारने स्पष्ट केली आहे. अशा व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळून आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र खोलीत किंवा विभागात ठेवावे.

तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जावं किंवा हेल्पलाइनला फोन करावा असा सल्ला देण्यात आलाय. संशयित व्यक्तीला कमी किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं असतील तर त्याला घरीच विलगीकरणार ठेवता येईल, असा सल्लाही सरकारने दिला आहे.

या व्यक्तीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झाल्यावर कार्यालय निर्जंतुक करावं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं, असंही सरकारनं कळवलं आहे. यानुसार संपर्कात आलेल्या आणि जास्त धोका असलेल्या व्यक्तींना १४ दिवसात विलगीकरणात ठेवण्याचा सल्लाही सरकारनं दिला आहे. तर कमी धोका असलेल्या व्यक्ती कार्यालयात येऊन काम करू शकतात मात्र १४ दिवस त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

यासंदर्भात सर्व व्यक्तींसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यालयात एक किंवा दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असेल तर ४८ तासापूर्वीपर्यंत त्यांनी भेट दिलेली ठिकाणं निर्जंतुक करणं पुरेसं आहे.

अशा परिस्थितीत पूर्ण कार्यालय सील करणं आणि कामं बंद करणं गरजेचं नाही. मात्र मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले असतील तर कार्यालयाचा संबंधित भाग किंवा संबंधित मजला निर्जंतुक केल्यानंतर ४८ तासांसाठी बंद ठेवावा असा सल्ला सरकारनं दिला आहे. या काळात इतर व्यक्ती घरून काम करु शकतील.

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींविषयीही सरकारनं माहिती दिली आहे. त्यानुसार बाधित व्यक्तीने त्यापूर्वीच्या २ दिवसात भेट दिलेल्या व्यक्ती आणि त्याला विलगीकरणात ठेवल्यानंतर पुढच्या १४ दिवसात लक्षण दिसलेल्या व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला आहे.

ज्या व्यक्तींचा संबंध रुग्णाची शिंक, रक्त, लाळ, खोकला किंवा शरीरातले इतर स्राव यांच्याशी आला आहे त्यांचा समावेश धोका जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.

त्या व्यक्तीला पीपीई किट शिवाय थेट स्पर्श करणाऱ्या व्यक्ती, त्याचे कपडे, त्याची भांडी, त्याने वापरलेले अंथरुण किंवा त्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचा समावेश जास्त धोका असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे. कुठल्याही खबरदारी शिवाय त्याच्यापासून १ मीटर अंतरावर आलेल्या व्यक्ती किंवा प्रवासात सर्व खबरदारी घेऊनही ६ तासांपेक्षा रुग्णाच्या सोबत प्रवास केलेल्या व्यक्तींचा समावेश जास्त धोका असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.

या व्यक्तीसोबत कार्यालयात, एकाच खोलीत काम केलेल्या व्यक्ती, त्याच्यासोबत कमी धोकादायक अवस्थेत प्रवास केलेल्या व्यक्तींचा समावेश कमी धोका असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आलेला आहे.

केंद्र सरकारने कार्यालयं आणि इतर ठिकाणी घ्यायच्या खबरदारीविषयी दिशानिर्देश काल प्रसिद्ध केले. त्यानुसार ६५ वर्षावरच्या व्यक्ती, हृद्यरोग, मधुमेह, दमा, रक्तदाब यासारखे आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवतींना घरीच राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. इतर व्यक्तींनीही सार्वजनिक ठिकाणी किमान ६ फुटांचे अंतर ठेवावे.

चेहरा झाकून घ्यावा किंवा त्याला मास्क लावावा. हँडवॉश, सॅनिटायझर, साबणाने वारंवार हात धुवावे. खोकला, शिंक आल्यावर रुमाल, टिशू पेपर वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. याशिवाय स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आजारपणाची लक्षणं दिसली तर वरिष्ठांना कळविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची थर्मल स्कॅनरने तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणं नसलेले अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरच्या व्यक्तींनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातले कर्मचारी कार्यालयात येऊ शकणार नाही. या व्यक्तींना घरून काम करण्याची परवानगी द्यावी आणि हा कालावधी रजा म्हणून गृहित धरु नये असेही सरकारने सांगितले आहे. वाहनाच्या आतला भाग, स्टिअरिंग, दरवांचे हँडल, चावी सातत्याने निर्जुंतक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कार्यालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना शक्यतो प्रवेश देऊ नये. अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना वरिष्ठांच्या परवानगी नंतरच ऑफिसमध्ये येऊ द्यावं, असा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. शक्य त्या बैठका व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने घ्याव्या, असेही सरकारने सांगितले आहे.

गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्या, जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्या, पार्किंगच्या ठिकाणी आणि इतरत्र गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायलाही सरकारने सांगितलं आहे. शक्य असल्यास अधिकारी, कर्मचारी आणि इतर व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रवेशद्वाराची सोय करण्याचा सल्लाही देण्यात आलाय.

कार्यालयात बसताना कर्मचारी एकमेकांपासून पुरेशा अंतरावर असतील याची काळजी घेण्यात यावी. लिफ्टमध्येही व्यक्तींची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगण्यात आले आहे.

कार्यालय, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय आणि इतर ठिकाणी पुरेशी स्वच्छता करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published.