कृषी कायद्यांबाबत सरकारची भूमिका 22 जानेवारीला होती, तीच आजही कायम; कृषीमंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव आजही कायम आहे- पंतप्रधान

संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याचे महत्व पंतप्रधानांनी केले अधोरेखित

नवी दिल्ली, 30 जानेवारी 2021

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आज म्हणजेच 30 जानेवारी 2021 रोजी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले.

सुरुवातीला पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि महात्मा गांधींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे असे आवाहन केले. आज सकाळी अमेरिकेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या प्रकाराचाही त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. अशाप्रकारच्या द्वेषपूर्ण वातावरणाला आपल्या समाजात कोणीही स्वीकारणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. 

कृषी कायद्यांबाबत असलेल्या समस्यांबाबत सरकार स्वच्छ मनाने विचार करत आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. कृषी कायद्यांबाबत सरकारची 22 जानेवारी रोजी जी भूमिका होती, तीच आजही आहे आणि कृषीमंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना जो प्रस्ताव दिला होता, तो आजही कायम आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. चर्चा पुन्हा करण्यासाठी कृषीमंत्री केव्हाही तयार आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

26 जानेवारीला झालेल्या घटनांबाबत काही नेत्यांनी केलेली वक्तव्ये दुर्दैवी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या सर्व प्रकरणी, कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत काही नेत्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर विस्तृत आणि मोकळेपणाने चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संसदेचे काम सुरळीत चालण्याचे आणि विविध विषयांवर सदनात व्यापक चर्चा-वादविवाद करण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.  संसदेचे कामकाज वारंवार बाधित झाल्यास त्याचा सर्वाधिक त्रास छोट्या पक्षांना होतो कारण त्यांना आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे संसदेचे काम सुरळीत ठेवण्याची जबाबदारी मोठ्या पक्षांची आहे. कामकाज सुरळीत चालले तरच लहान पक्षांना आपले मुद्दे आणि प्रश्न  मांडता येऊ शकतील असे ते म्हणाले .

जागतिक पटलावर अनेक सकारात्मक गोष्टींमध्ये, अनेक क्षेत्रात  भारत महत्वाची भूमिका पार पडू शकतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.  आपल्या देशातील लोकांची कौशल्ये आणि सामर्थ्य यांचा उल्लेख करुन ते म्हणाले की जागतिक कल्याणासाठी भारतीयांचे हे सामर्थ्य मोठी शक्ती म्हणून उपयुक्त ठरू शकेल.