पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. जेव्हा मी मन की बात करत असतो, तेव्हा असं वाटतं की, जणू आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबातल्या सदस्याच्या रूपानं उपस्थित आहे. आमच्या लहान लहान गोष्टी, ज्या एकमेकांना काही तरी शिकवण देऊन जातात, जीवनातील आंबटगोड अनुभव, जे आयुष्य संपूर्णपणाने जगण्याची प्रेरणा बनतात, बस, हीच तर आहे मन की बात. आज, 2021 च्या जानेवारीचा अखेरचा दिवस आहे. आताच काही दिवसांपूर्वी तर 2021 वर्ष सुरू झालं होतं, माझ्याप्रमाणे आपणही असाच विचार करत आहात का? असं वाटतच नाही की, पूर्ण जानेवारी महिना संपून गेला आहे- काळाची गति यालाच तर म्हणतात. जेव्हा आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत होतो, नंतर आम्ही लोहडी सण साजरा केला, मकर संक्रांति साजरी केली, पोंगल, बिहु हे सण साजरे केले, या आताच काही दिवसांपूर्वीच्या घटना वाटतात. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सणांची धामधूम होती. 23जानेवारीला आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शानदार संचलनही पाहिलं. राष्ट्रपतीं महोदयांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधन केल्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू झालं आहे. हे सर्व होत असतानाच, आणखी एक गोष्ट झाली, ज्याची आपणा सर्वांनाच प्रतिक्षा असते-आणि ती म्हणजे पद्म पुरस्कारांची घोषणा. असामान्य काम करणाऱ्या  लोकांचा, त्यांची कामगिरी आणि मानवतेप्रति त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, देशानं गौरव केला. या वर्षीही, पुरस्कार मिळालेल्यांमध्ये, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्युत्कृष्ट काम केलं आहे, आपल्या काऱ्या नं लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं आहे, देशाला पुढे नेलं आहे, त्यांचा समावेश आहे. म्हणजे, प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या  आणि कुठेही प्रसिद्धी न मिळालेल्या अशा अप्रसिद्ध नायकांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्याची जी परंपरा देशानं काही वर्षांपूर्वी सूरू केली होती, ती, या प्रकारे, यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. माझा आपल्या सर्वांना विनंती आहे की, या लोकांबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल, आपण जरूर माहिती करून घ्या, कुटुंबात त्यांच्याबद्दल चर्चा करा. पहा, त्यापासून किती प्रेरणा मिळते.

या महिन्यात, क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आमच्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी आहे. हे सर्व घडत असताना, दिल्लीत, 26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश, अत्यंत व्यथितही झाला आहे. आम्हाला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे. गेल्या वर्षी आम्ही असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं. यावर्षीही आम्हाला कठोर मेहनत करून आमच्या संकल्पांची पूर्तता करायची आहे. आमच्या देशाला आणखी वेगानं पुढं न्यायचं आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षीच्या सुरूवातीलाच कोरोनाच्या विरोधातल्या आमच्या लढ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आहे. ज्याप्रमाणे, कोरोनाच्या विरोधातली आमची लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली, तसंच, आता आमचा लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे. आज भारत जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. आपल्याला माहित आहे, यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट ती कोणती? आम्ही सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आमच्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. केवळ 15 दिवसांमध्ये, भारतानं, आपल्या 30 लाखांहून अधिक, कोरोना योद्ध्यांचं लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी 18 दिवस लागले होते तर ब्रिटनला तब्बल 36दिवस लागले होते.

मित्रांनो, भारतात बनवलेली लस (मेड इन इंडिया) आज, भारताच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे, भारताच्या आत्मसन्मानाचंही प्रतिक आहे. नमो अपवर उत्तरप्रदेशातले भाई हिमांशु यादव यांनी लिहिलं आहे की, मेड इन इंडिया लसीमुळे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मदुराईहून कीर्तिजी यांनी लिहिलं आहे की, त्यांचे अनेक परदेशी असलेले अनेक मित्र, त्यांना, संदेश पाठवून भारताचे आभार मानत आहेत. कीर्तिजींच्या मित्रांनी त्यांना लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, भारतानं ज्या प्रकारे कोरोनाविरोधातल्या लढ्यात जगाला मदत केली आहे, त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात असलेली प्रतिष्ठा आणि आदर आणखीच वाढला आहे. कीर्तिजी, देशाबद्दलचं हे गौरवगीत ऐकून, मन की बातच्या श्रोत्यांनाही अभिमान वाटतो.

सध्या मलाही वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्र्याकडून भारताबद्दल असेच संदेश प्राप्त होत आहेत. आपण पाहिलंच असेल, अलिकडेच ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी, ट्विट करून ज्या पद्धतीनं भारताला धन्यवाद दिले आहेत, ते पाहून प्रत्येक भारतीयाला किती छान वाटलं. हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या, जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना रामायणातल्या त्या प्रसंगाची इतकी सखोल माहिती आहे, त्यांच्या मनावर इतका खोल प्रभाव आहे-हेच आमच्या  संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.

मित्रांनो, या लसीकरण कार्यक्रमात, आपण, आणखी एका गोष्टीवर जरूर लक्ष केंद्रित केलं असेल. संकटाच्या घडीला, भारत आज जगाची सेवा करू शकत आहे, कारण, भारत, आज, औषधे आणि लसीच्या बाबतीत सक्षम आहे, आत्मनिर्भर आहे. हाच विचार आत्मनिर्भर भारत अभियानाच्या मागेही आहे. भारत जितका अधिक सक्षम होईल, तितकी अधिक, मानवतेची सेवा करेल, तितका जास्त जगाला त्याचा लाभ होईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, प्रत्येक वेळेला आपली अनेक पत्रं मिळतात, नमो ॲप आणि मायगव्ह वर आपले संदेश येतात आणि फोन कॉल्सच्या माध्यमातून आपली मतं जाणून घेण्याची संधी मिळते. याच संदेशांमध्ये, एका संदेशानं माझं लक्ष वेधलं- हा संदेश भगिनी प्रियंका पांडेयजी यांचा आहे. 23 वर्षाच्या प्रियकांजी, हिंदी साहित्याच्या विद्यार्थिनी असून बिहारच्या सिवानमध्ये रहातात. प्रियंकाजी यांनी नमो ॲपवर लिहिलं आहे की, देशातल्या 15 पर्यटन स्थळांना भेटी देण्याच्या माझ्या सूचनेनं त्या अत्यंत प्रेरित झाल्या आणि म्हणून, एक जानेवारीला त्या अशा स्थळी निघाल्या जे अतिशय खास होतं.  हे स्थळ होतं, देशाचे पहिले राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांचं वडलोपार्जित घर, जे त्यांच्या घरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. प्रियंकाजी यांनी खूप सुंदर लिहिलं आहे की, आपल्या देशातल्या महान विभूतींना जाणून घेण्याच्या दृष्टिनं त्यांचं हे पहिलंच पाऊल होतं. प्रियंकाजी यांना तिथं डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं मिळाली, अनेक ऐतिहासिक छायाचित्रं मिळाली. खरोखर, प्रियंकाजी, तुमचा हा अनुभव, इतरांनाही, प्रेरित करेल.

मित्रांनो, यावर्षापासून भारत, आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा समारंभ- अमृतमहोत्सव सुरू करत आहे. अशातच, आमच्या त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं.

मित्रांनो, आम्ही स्वातंत्र्याच आंदोलन आणि बिहारबद्दल चर्चा करत असताना, मी नमो ॲपवर करण्यात आलेल्या आणखी एका टिप्पणीबद्दल चर्चा करू इच्छितो. मुंगेरमध्ये रहाणारे जयराम विप्लव़जींनी मला तारापूर शहिद दिनाबद्दल लिहिलं आहे. 15 फेब्रुवारी, 1932 रोजी, देशभक्तांच्या एका गटामध्ये सामिल झालेल्या अनेक तरूण वीर जवानांची, इंग्रजांनी अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती. वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा ते देत होते, एवढा एकच त्यांचा गुन्हा होता. मी त्या हुतात्म्यांना वंदन करतो आणि त्यांच्या धाडसाचं श्रद्धेनं स्मरण करतो. मी जयराम विप्लवजी यांना धन्यवाद देऊ इच्छितो. ज्या घटनेवर तितकीशी चर्चा झाली नाही , जी व्हायला हवी होती, अशी एक घटना त्यांनी देशासमोर आणली आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या प्रत्येक भागात, प्रत्येक शहर, प्रत्येक कसबा आणि गावात स्वातंत्ऱ्या चा संग्राम अगदी संपूर्ण ताकदीनिशी लढला गेला होता. भारताच्या भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा महान सुपुत्र आणि वीरांगनांनी जन्म घेतला, ज्यांनी, राष्ट्रासाठी आपलं जीवन वाहून टाकलं, अशात, आम्ही त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या आठवणी काळजीपूर्वक जतन करणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.  आणि त्यांच्याबाबतीत लिहून आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यांच्या स्मृति चिरंतन ठेवू शकतो.

मी सर्व देशवासी आणि खासकरून युवक मित्रांना, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल, स्वातंत्ऱ्या शी संबंधित घटनांबद्दल लिहावं, असं आवाहन करतो. आपल्या भागातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल पुस्तक लिहावं. आता, भारत आपल्या स्वातंत्ऱ्या ची पंचाहत्तरी साजरी करत असताना, आपलं लिखाण स्वातंत्र्य संग्रामातल्या नायकांच्या प्रति एक उत्तम श्रद्धांजलि ठरेल. तरूण लेखकांसाठी भारताच्या पंचाहत्तरीनिमित्त एक उपक्रम सुरू केला जात आहे. यातून सर्व राज्यं आणि भाषांमधील युवा लेखकांना प्रोत्साहन मिळेल. देशात अशा विषयांवर लिहिणारे लेखक मोठ्या प्रमाणात तयार होतील, ज्यांचा भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास असेल. आम्हाला अशा होतकरू प्रतिभावंतांना पूर्ण मदत करायची आहे. यामुळे भविष्याची दिशा निश्चित करणाऱ्या विचारवंत नेत्यांचा एक वर्गही तयार होईल. माझ्या युवा मित्रांना, या पुढाकाराचा भाग बनून आपल्या साहित्यिक कौशल्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी मी आमंत्रित करतो. या पुढाकाराशी संबंधित माहिती शिक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून प्राप्त करता येईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये श्रोत्यांना काय आवडतं, हे आपल्यालाच अधिक चांगल्या प्रकारे माहित आहे.परंतु, मला मन की बात मध्ये सर्वात जास्त हे आवडतं की, मला खूप काही जाणून घ्यायला, शिकायला आणि वाचायला मिळतं. एक प्रकारे, प्रत्यक्षात, आपणा सर्वांमध्ये, सामिल होण्याची संधी मिळते. कुणाचा प्रयत्न, कुणाची उत्कट भावना, देशासाठी काही तरी करून जाण्याचं कुणाचं वेड- हे सारं, मला, खूप प्रेरित करतं आणि उर्जा देऊन जातं.

हैदराबादच्या बोयिनपल्लीमध्ये, एक स्थानिक भाजी मंडई, कशा प्रकारे आपली जबाबदारी पार पाडत आहे, हे वाचूनही मला खूप चांगलं वाटलं. आपण सर्वांनी हे पाहिलंच आहे की, भाजी मंडईत अनेक कारणांनी भाजी खराब होत असते. ही भाजी इकडेतिकडे पडलेली असते, त्यामुळे दुर्गंधीही पसरलेली असते. परंतु, बोयिनपल्लीच्या भाजी मंडईनं, अशा पद्धतीनं दररोज उरलेली ही भाजी तशीच फेकायची नाही, असं ठरवलं. भाजी मंडईशी संबंधित लोकांनी या भाजीपासून वीज तयार करायची, असा निर्णय घेतला. खराब झालेल्या भाजीपासून वीज तयार करण्याबद्दल आपण क्वचितच ऐकलं असेल-हीच तर नाविन्यपूर्ण संशोधनाची शक्ति आहे. आज बोयिनपल्ली मंडईत जो कचरा होता, त्यापासून संपत्तीची निर्मिती होत आहे- हा कचऱ्यापासून सोनं बनवण्याचा प्रवास आहे. तिथं जो दररोज 10 टन कचरा निघतो, तो एका प्रकल्पात तो जमा केला जातो. प्रकल्पात या कचऱ्यापासून दररोज 500 युनिट वीज निर्माण केली जाते आणि जवळपास 30 किलो जैविक इंधनही तयार केलं जातं. याच विजेतून भाजी मंडई प्रकाशमान होते आणि जे जैविक इंधन तयार होतं, त्यावरच, मंडईतल्या कँटिनमध्ये खाण्याचे पदार्थ तयार केले जातात. आहे नं प्रयत्नांची कमाल!

अशीच एक प्रयत्नांची कमाल, हरियाणाच्या पंचकुलाच्या बडौत ग्रामपंचायतीनंही करून दाखवली आहे. या पंचायत  क्षेत्रामध्ये पाण्याचा निचरा होण्याची समस्या होती. यामुळे गलिच्छ पाणी इकडेतिकडे पसरत होतं, त्यामुळे आजार बळावले होते. परंतु, बडौतच्या लोकांनी या वाया जाणाऱ्या  पाण्यापासून संपत्ती निर्माण करू या, असं ठरवलं.

ग्रामपंचायतीनं पूर्ण गावात येणारं गलिच्छ पाणी एका ठिकाणी साठवून गाळायला सुरूवात केली आणि गाळलेलं हे पाणी आता गावातील शेतकरी, शेतातील सिंचनासाठी वापरत आहेत, म्हणजे, प्रदूषण, घाण आणि आजारांपासून सुटकाही मिळाली आणि शेताला पाणीही मिळालं.

मित्रांनो, पर्यावरण संरक्षणातून उत्पन्नाचे कसे मार्ग निघतात, याचं एक उदाहरण  अरूणाचल प्रदेशाच्या तवांगमध्येही पहायला मिळालं आहे. अरूणाचल प्रदेशाच्या या पहाडी भागात मोन शुगु नावाचा कागद शतकांपासून बनवला जातो. हा कागद इथल्या स्थानिक शुगु शँग नावाच्या रोपाच्या सालीपासून बनवला जातो. म्हणून, हा कागद तयार करण्यासाठी या झाडांना तोडावं लागत नाही . याशिवाय, हा कागद बनवताना कोणत्याही रसायनाचा वापर करावा लागत नाही , म्हणजे हा कागद पर्यावरण दृष्ट्या आणि आरोग्यासाठीही अगदी सुरक्षित आहे. एक काळ असा होता की,  जेव्हा या कागदाची निर्यात होत असे. पंरतु, जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानानं मोठ्या प्रमाणात कागदाचं उत्पादन होऊ लागलं, तेव्हा ही स्थानिक कला बंद पडण्याच्या बेतात आली. आता एक सामाजिक कार्यकर्ता, गोम्बू यांनी या कलेला पुनरूज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे इथल्या आदिवासींना रोजगारही मिळत आहे.

मी केरळची एक बातमी पाहिली आहे, जी, आम्हा सर्वांना आमच्या जबाबदारीची जाणिव करून देते. केरळच्या कोट्टायममध्ये एक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक  आहेत-एन एस राजप्पन साहेब. राजप्पन जी पक्षाघाताचा झटका आल्यानं चालू शकत नाहीत, परंतु त्यामुळे, स्वच्छतेप्रति त्यांच्या समर्पित भावनेत काहीही उणिव आलेली नाही . गेल्या अनेक वर्षांपासून ते, वेम्बनाड तलावात जातात आणि तलावात फेकण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बाहेर काढून घेऊन येतात. विचार करा, राजप्पनजी यांचे विचार किती उच्च दर्जाचे आहेत. आम्हालाही, राजप्पनजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन, स्वच्छतेसाठी, जिथं शक्य असेल तिथं, आपलं योगदान दिलं पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो

काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल, अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोहून बंगळुरू साठी उड्डाण केलेल्या एका नॉन स्टॉप विमानाची धुरा भारताच्या 4 महिला वैमानिकांनी सांभाळली होती. दहा हजार किलोमीटर पेक्षा  जास्त दूरचा प्रवास करून हे विमान सव्वा दोनशे पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन भारतात आलं. तुम्ही यावेळी 26 जानेवारीच्या संचलनातही पाहिलं असेल, भारतीय वायुदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी नवा इतिहास रचला आहे. क्षेत्र कुठलेही असो, आपल्या देशातल्या महिलांचं योगदान सातत्यानं वाढतच आहे. पण एक गोष्ट आपल्या नेहमीच लक्षात येत असेल की देशातल्या गावागावांमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या बदल घडवणाऱ्या  घडामोडी होत असतात, मात्र त्या बदलांची तेवढी चर्चा होत नाही. म्हणूनच मी जेव्हा मध्यप्रदेशच्या जबलपूर मधली एक बातमी पाहिली तेव्हा मला असं वाटलं की या बातमीचा उल्लेख मला मन की बात मध्ये नक्कीच करायला हवा. ही बातमी खूपच प्रेरणादायी आहे. जबलपूरच्या चिचगावात काही आदिवासी बायका एका राईस मिल म्हणजेच भाताच्या गिरणी मध्ये रोजंदारी वर काम करत होत्या. कोरोनाच्या जागतिक महासाथीनं जसं जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ग्रासलं त्याचप्रमाणे या महिलांना सुद्धा त्याची झळ पोहोचली. त्यांचं राईस मिलमधलं काम थांबलं. स्वाभाविकच आहे यामुळे त्यांच्या कमाईतही अडथळे येऊ लागले, पण त्यामुळे त्या निराश झाल्या नाहीत, त्यांनी हार मानली नाही. सगळ्या जणी एकत्र मिळून स्वतःची राईस मिल सुरू करूया, असं त्यांनी ठरवलं. त्या ज्या मिलमध्ये आधी काम करत होत्या त्या मालकालाही आपली यंत्रसामुग्री विकायचीच होती. या महिलांपैकी मीना रहांगडळेजींनी  सर्व महिलांना एकत्र आणून स्वयंसहाय्यता गट तयार केला आणि सर्वजणींनी आपल्या आजवरच्या बचतीतून पैसे गोळा केले. जेवढे पैसे कमी पडले त्यासाठी आजीविका मिशन योजनेअंतर्गत बँकेतून कर्ज घेतलं आणि आता पहा या आदिवासी भगिनींनी तीच राईस मिल खरेदी केली, जिथे त्या कधी कामगार म्हणून काम करत होत्या. त्या आता आपली स्वतःची राईस मिल चालवत आहेत. या एवढ्या गेल्या काही दिवसात या मिलमधून त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा नफा सुद्धा कमावला आहे. या नफ्यातून मीनाजी आणि त्यांच्या सहकारी महिला, सर्वात आधी बँक कर्ज चुकवून, नंतर आपला व्यापार आणखी वाढवण्याची तयारी करत आहेत. कोरोनानं जी परिस्थिती निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली आहेत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

बुंदेलखंड विषयी बोताना, बुंदेलखंड विषयी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लगेच आपल्या मनात येतील?  इतिहासात रस असलेले लोक या भागाला झाशीची राणी लक्ष्मीबाईंशी जोडतील, तर काही लोक सुंदर आणि शांत अशा ओरछा या पर्यटनस्थळा विषयी विचार करतील. काहीजणांना या भागात जाणवणाऱ्या जबरदस्त अशा उकाड्याची आठवण येईल. पण सध्या इथे काही वेगळच होत आहे, जे खूप उत्साहवर्धक आहे आणि याविषयी आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला हवं. काही दिवसांपूर्वी झाशीत एक महिना चालणारा स्ट्रॉबेरी महोत्सव सुरू झाला. प्रत्येकाला आश्चर्य वाटेल, स्ट्रॉबेरी आणि बुंदेलखंड! पण हे सत्य आहे! आता बुंदेलखंडात स्ट्रॉबेरीची शेती करण्याबाबत उत्साह वाढतोय आणि यात खूप मोठी भूमिका निभावली आहे, झाशीची एक सुपुत्री गुरलीन चावला हिनं. कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या गुरलीननं आधी आपल्या घरात आणि नंतर शेतात, स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून झाशीमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते हा विश्वास जागवला आहे. झाशीचा स्ट्रॉबेरी महोत्सव, स्टे ॲट होम संकल्पनेवर भर देतो. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आणि युवावर्गाला, आपल्या घराच्या सभोवताली रिकाम्या जागेवर किंवा घराच्या गच्चीवर बागकाम करून स्ट्रॉबेरी पिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं असेच प्रयत्न देशाच्या इतर भागांमध्ये सुद्धा होत आहेत. डोंगराळ भागात थंड हवामानात घेतलं जाणारं पीक म्हणून स्ट्रॉबेरीची कधीकाळी ओळख होती. हीच स्ट्रॉबेरी आता कच्छच्या रेताड जमिनीत सुद्धा उगवायला लागली आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवत आहे.

मित्रांनो, स्ट्रॉबेरी महोत्सवासारखे प्रयोग नवोन्मेषाची उर्मी तर दर्शवतातच, पण त्याच बरोबर हे ही दाखवतात की आमच्या देशातलं कृषिक्षेत्र कसा नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आहे.मित्रांनो, शेतीला आधुनिक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे. सरकारचे प्रयत्न यापुढेही असेच सुरू राहतील.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बघितला. हा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या वेस्ट मिदनापूर इथल्या नया पिंगला या गावातले एक चित्रकार सरमुद्दीन यांच्याबाबत होता. रामायणावर बनवलेल्या त्यांच्या चित्राची दोन लाख रुपयांमध्ये विक्री झाल्याबद्दल, ते समाधान व्यक्त करत होते. यामुळे त्यांच्या गाववाल्यांनाही खूप आनंद झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याबाबत आणखी काही जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढली. अशाच प्रकारे  मला पश्चिम बंगालशी संबंधित आणखी एका खूपच चांगल्या उपक्रमाविषयी माहिती मिळाली, ज्याबाबत  तुमच्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल. पर्यटन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने या महिन्याच्या सुरुवातीलाच, बंगालमधल्या गावांमध्ये, ‘इनक्रेडीबल इंडिया विकेंड गेटवेज’ या उपक्रमाची सुरुवात केली. यामध्ये, पश्चिम मिदनापूर, बांकुरा, बीरभूम, पुरुलिया, पूर्व वर्धमान इथल्या हस्तशिल्प कलाकारांनी, तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हस्तकला कार्यशाळांचं आयोजन केलं. मला असंही सांगण्यात आलं की या इन्क्रेडिबल इंडिया विकेंड गेटवेज दरम्यान झालेली हस्त कलाकुसरीच्या वस्तूंची विक्री, इथल्या हस्तकला कारागिरांना प्रोत्साहित करणारी ठरली. देशभरातले इतर भागातले लोक सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपली कला लोकप्रिय बनवत आहेत. ओदीशाच्या राऊरकेला मधल्या भाग्यश्री साहू यांनाच पहा. तशा त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आहेत, पण गेल्या काही महिन्यात त्यांनी पट्टचित्र कला शिकायला सुरुवात केली आणि त्यात नैपुण्यही मिळवलं. पण आपल्याला एक गोष्ट माहितेय की त्यांनी पेन्ट कुठे केलं!  सॉफ्ट स्टोन्स, चक्क सॉफ्ट स्टोन्सवर! महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाग्यश्रीना हे सॉफ्ट स्टोन्स मिळाले, त्यांनी ते एकत्र केले, स्वच्छ केले. नंतर त्यांनी रोज दोन तास या दगडांवर पट्टचित्राच्या शैलीत पेंटिंग केलं. या दगडांवर चित्र रंगवून त्यांनी ते दगड आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू म्हणून द्यायला सुरुवात केली. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी बाटल्यांवर सुद्धा पेंटिंग करायला सुरुवात केली. आता तर त्या, ही कला शिकवण्यासाठी कार्यशाळा सुद्धा आयोजित करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त, भाग्यश्रींनी या दगडांवर आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या भविष्यातल्या अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आर्ट आणि कलर्स च्या माध्यमातून खूप काही ही नवं शिकता येऊ शकतं, करता येऊ शकतं. झारखंडच्या दुमका इथल्या अशाच एका सुंदर उपक्रमाबाबत मला माहिती मिळाली. इथल्या माध्यमिक शाळेच्या एका मुख्याध्यापकांनी मुलांना शिकवण्यासाठी, गावातल्या सगळ्या भिंतीच, इंग्रजी आणि हिंदी अक्षरांनी रंगवल्या, सोबत वेगवेगळ्या प्रकारची चित्रही रंगवली. त्यामुळे गावातल्या मुलांना शिक्षणाच्या दृष्टीनं मदत मिळत आहे. मी, असे उपक्रम राबवणाऱ्या सर्व लोकांचं अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

भारतापासून हजारो किलोमीटर दूर, अनेक महासागर-बेटांच्या पलीकडे चिली नावाचा एक देश आहे. भारतातून चिलीला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र भारतीय संस्कृतीचा सुगंध तिथे खूप आधीपासूनच पसरलेला आहे. आणखी एक विशेष गोष्ट अशी आहे, तिथे योग खूपच लोकप्रिय आहे. तुम्हाला नवल वाटेल, चिलीची राजधानी सॅन्टीयागोत तीस पेक्षा जास्त योग विद्यालयं आहेत. चिलीत आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मला असं समजलं की चिलीतल्या हाऊस ऑफ डेप्युटीजमध्ये योग दिवसाच्या निमित्तानं खूपच उत्साहानं भारलेलं वातावरण असतं. कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वर भर देणं, प्रतिकारशक्ती वाढवणं यासाठी योगाचा होणारा चांगला उपयोग लक्षात घेऊन, इथले लोक आता योगाला पहिल्या पेक्षाही खूप जास्त महत्त्व देत आहेत. चिलीच्या संसदेनं एक प्रस्तावही संमत केला आहे. तिथेच चार नोव्हेंबरला राष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपण विचार कराल, चार नोव्हेंबरमध्येच असं काय आहे?  4 नोव्हेंबर 1962 रोजी चीलीमध्ये, होजे राफाल एस्ट्राडा यांनी पहिली योग संस्था स्थापन केली होती. हा दिवस राष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करून एस्ट्राडाजींना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली आहे. चिली संसदेनं केलेला हा एक असा विशेष सन्मान आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. चिली संसदेशी संबंधित आणखी एक गोष्ट आपल्याला भावेल. चिली सिनेटच्या उपाध्यक्षांचं नाव रवींद्रनाथ क्विन्टेरॉस आहे. त्यांचं हे नाव जागतिक कवी गुरुदेव टागोर यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो

माय गोव्ह या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री आणि केरळच्या पलक्कड इथले प्रल्हाद राजगोपालन यांनी आग्रह केला आहे की मन की बात मध्ये मी आपल्या सर्वांशी रस्ते सुरक्षेविषयी चर्चा करावी. याच महिन्यात 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत आपला देश, रस्ते सुरक्षा महिना म्हणजेच रोड सेफ्टी मंथ साजरा करत आहे. रस्ते अपघात केवळ आपल्याच देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. आज भारतात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपल्याला सर्वांनाच आपलं सक्रिय योगदान दिलं पाहिजे.

मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच सीमा रस्ते संघटना जे रस्ते बनवत आहे, त्या रस्त्यांवरून जाताना आपल्याला कितीतरी छान अशी नवनवीन स्लोगन्स म्हणजेच घोषवाक्य पाहायला मिळतात. धिस इज हाय वे-नॉट रन वे, किंवा मग, बी मिस्टर लेट दॅन लेट मिस्टर, अशी घोषवाक्य, रस्त्यांवर सावधगिरी बाळगण्यासाठी लोकांना जागृत करण्यात प्रभावशाली ठरतात. आता आपणही अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नव्या कल्पना, नवी घोषवाक्य माय गोव्ह वर पाठवू शकता. आपण पाठवलेल्या चांगल्या घोषवाक्यांचा वापरही होऊ शकतो.

मित्रांनो, रस्ते सुरक्षेबाबत बोलत असताना मी, नमो ॲप वर कोलकात्याच्या अपर्णा दासजी यांनी टाकलेल्या  एका पोस्ट वर चर्चा करू इच्छितो. अपर्णाजींनी मला फास्टॅग सुविधेबाबत बोलण्याचा आग्रह केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की फास्टॅग मुळे प्रवासाची एकंदर व्याख्याच बदलली आहे. फास्टॅग मुळे वेळेची बचत तर होतेच, पण टोल नाक्यावर थांबून रोख रक्कम भरण्यात येत असलेला त्रास संपला आहे. अपर्णाजींचं म्हणणं बरोबरच आहे. यापूर्वी आपल्या टोलनाक्यांवर एका गाडीला सरासरी सात ते आठ मिनिटं लागत होती. पण आता फास्टॅग आल्यानंतर ही वेळ सरासरी दीड ते दोन मिनिटांवर येऊन ठेपली आहे. टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्यात लागणारा वेळ कमी झाल्यानं गाडीच्या इंधनातही बचत होत आहे. यामुळे आपल्या देशवासीयांचे साधारण 21 हजार कोटी रुपये वाचत असल्याचा अंदाज आहे. म्हणजे पैशांची बचत आणि वेळेचीही बचत. माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करत आपण स्वतःकडे लक्ष द्या आणि दुसऱ्यांचा जीव सुद्धा वाचवा.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

आपल्याकडे असं म्हणतात-‘ जलबिंदू निपातेन क्रमश: पूर्यते घट:’. अर्थात पाण्याच्या एकेका थेंबानच अखेर पूर्ण घडा भरतो. आपल्या एकेका प्रयत्नातूनच आपले मोठमोठे संकल्प पूर्ण होत असतात. म्हणूनच 2021 या वर्षाची सुरुवात, जी उद्दिष्ट ठेवून आपण केली आहे, ती सर्व उद्दिष्ट आपल्याला सर्वांनी मिळूनच गाठायची आहेत. तर चला, आपण सर्वजण मिळून हे वर्ष सार्थ ठरवण्यासाठी आपली पावलं उचलू या. आपण आपले संदेश, आपल्या कल्पना नक्की पाठवत रहा. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया.

इति- विदा पुनर्मिलनाय!