मराठवाड्यातील रस्ते विकासाचा अनुशेष मार्गी लावू – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

आसना नदीवरील जुन्या पुलाची पूर्नबांधणी व रुंदीकरण कामाचे भूमिपूजन
May be an image of 12 people and people standing

नांदेड,दि.22 :- मराठवाड्यातील रस्ते विकासाचा अनुशेष मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला हे सत्य कुणाला नाकारता येणार नाही. विशेषत: ग्रामीण भागातील रस्त्याची जी दैना झाली आहे ती लक्षात घेवून महाविकास आघाडी शासनाने हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरविले आहे. मराठवाड्याला न्याय देण्याची जबाबदारी मी स्विकारलेली असून मराठवाड्याचा अनुशेष आम्ही एकजूटीतून पूर्ण करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमच्या एकत्रित विचारातून तिंघाची जी शक्ती एकत्र झाली आहे ती जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड-अर्धापूर (पूर्व वळण रस्ता) मार्गावरील आसना नदीच्या जूनापूल व पोच मार्गाचे दुरुस्ती व रुंदीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, गणपतराव तिडके, गोविंद नागेलीकर, दत्ता कोकाटे, हरिहरराव भोसीकर, उपमहापौर मसुद अहेमद खान, गुरुद्वाराचे संतबाबा सुखदेवसिंघजी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी उपस्थित होते.

मागील वर्षभराचा काळ हा कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या राज्य सरकारलाही अत्यंत आव्हानात्मक होता. एका बाजुला कोरोनापासून जनतेची सुरक्षितता, ज्यांना कोरोनाची बाधा झाली त्यांना त्यांच्या गावाजवळच उपचाराची सुविधा आणि याअनुषंगाने शासकिय, वैद्यकीय सेवा-सुविधा विकासाची कामे यामुळे इतर विकास कामावर इच्छा असूनही सुरवात करता आली नाही. जनजीवन सुरळीत सुरु झाल्यानंतर आता राज्याचा अर्थकारणाचा गाडा हळूहळू सुधारत असून यापुढच्या कालावधीत विविध विकास कामे पूर्ण करण्यावर आम्ही शर्थीचे प्रयत्न करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

May be an image of 8 people, including Narendra Baviskar and people standing

नांदेड जिल्हा कृषिप्रधान असल्याने स्वाभाविकच कृषीपूरक उद्योगावर आधारित होणारी वाहतूक ही मोठ्याप्रमाणात आहे. यात ऊसाचे कारखाने लक्षात घेता ऊसाची वाहतूक जास्त आहे. रस्त्याचा विकास केवळ महानगरे डोळ्यापुढे ठेवून नव्हे तर ग्रामीण भागही विकासाशी जुळला जावा म्हणून मी दक्षता घेत आहे. नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामाबाबत या जिल्ह्याचा भूमिपुत्र असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून आजवर जो अनुशेष निर्माण झाला तो लवकर पूर्ण करील असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावे यादृष्टिने मी विचार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करुन तात्काळ त्याला होकार दिला. याबाबत आम्ही निर्णय घेतला असून आता नांदेड ते जालना पर्यंतचा 194 किमीचा स्वतंत्र मार्ग तयार केला जाईल. हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रेटचा असून यास 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येईल. यामुळे नांदेड येथून मुंबईला जाणे अधिक सुखकर होईल व नांदेडच्या विकासाला चालना मिळेल. या नव्या महामार्गासमवेत आजच्या घडीला जो जुना महामार्ग आहे त्या नांदेड ते औरंगाबाद मार्गावरील ज्या-ज्या ठिकाणी छोटे-छोटे रस्त्याचे तुकडे काम करायचे बाकी आहे, अशा रस्त्यांच्या दुरुस्तीची कामेही पूर्ण करता यावीत यासाठी अर्थसंकल्पात खास निधी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये ज्याप्रमाणे महानगरातून जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल उभारला आहे त्याचधर्तीवर नांदेडमध्ये आपल्या बाफना उड्डाणपूलापासून सूतगिरणीपर्यंत नवीन उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. तरोडा गावठाण शिवमंदिर ते महादेव पिंपळगाव हा नवीन रस्ताही आपण करु. माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांचाही या मार्गासाठी न्याय्य आग्रह होता. याचबरोबर तरोडा-महादेव पिंपळगाव-दाभड असा मार्ग विकसित कसा केला जावू शकतो याचे नियोजन व यासाठी लागणारी पूर्वतयारी सुरु केल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

नांदेडच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी अतिशय दक्ष भूमिका बजावली आहे. आसना नदीवरील या पुलावर वेळोवेळी होणारी वाहतुकीची कोंडी व रस्ते अपघात लक्षात घेता येथे नवीन पुलाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून हा पूल मंजुरीसह लवकर पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे आमदार मोहन हंबर्डे यांनी सांगितले. मागील पाच वर्षापासून या पुलावरील काम रखडले असल्यामुळे अनेकवेळा वाहतुकीच्या कोंडीसह नांदेडकरांना अनेक संकटाचा सामना करावा लागत होता. आता या नव्या पुलामुळे रस्त्याच्या कोंडीसह विकासाचा नवा मार्ग खुला झाला असल्याचे आमदार अमर राजूकर यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाला त्यांनी समान न्याय दिला असून समग्र नांदेड जिल्हा विकासाची जबाबदारी पालक या नात्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्विकारली असल्याचे गौरोद्गार आमदार बालाजी कल्याणकर यांनी काढले.

भोकर येथे विविध विकास कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. यात प्रामुख्याने हदगाव-तामसा-भोकर-उमरी-लोहगाव रस्त्याचे भूमिपूजन. शासकीय विश्रामगृह भोकर येथील इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन. भोकर-मुदखेड रस्त्याचे भूमिपूजन. भोकर नगरपरिषद अंतर्गत 12 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन. प्रस्तावित भोकर वळण मार्गाचे भूमिपूजन. आयटीआय प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन. नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकामाचे भूमिपूजन या कार्यक्रमाचा यात समावेश होता.

या भोकरच्या विविध विकास कामांचा शुभारंभानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जाहिर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर येथील विविध विकास कामाबाबत कटीबद्धता व्यक्त करुन मी सर्वांसोबत असल्याची ग्वाही दिली. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर व इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.

भोकर व नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रस्ताविक करुन विविध विकास कामांची तांत्रिक माहिती दिली. स्व. सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतींना पालकमंत्र्यांनी दिला उजाळा मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी व मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी आयुष्यभरआग्रही भूमिका मांडणारे ज्येष्ठ संपादक स्व. सुधाकरराव डोईफोडे यांचा आज स्मृती दिन होता. या स्मृतीदिनाचात्यांनी आवर्जून उल्लेख करत मराठवाड्याचा विकासासाठी त्यांनी वेळोवेळी जी भूमिका घेतली त्याचे समरणकरुन कृतज्ञता व्यक्त केली.