स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. 22 : थोर स्वतंत्रतासेनानी, मराठवाडा, हैदराबाद मुक्तीलढ्याचे प्रणेते, महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या संकल्पनेचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील, मराठवाडा, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील योगदान खुप मोठे आहे. भिन्नभाषिक समाजबांधवांना संघटित करुन त्यांनी मराठवाडा, हैदराबाद मुक्तीचा लढा यशस्वी करुन दाखवला. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रात योगदान तर दिलंच, परंतु त्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारे नेतेही त्यांनी घडवले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अभ्यासू, व्यासंगी, दूरदृष्टीतूनच संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना आकार घेऊ शकल्याचे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्र्यांनी काढले. स्वातंत्र्य लढ्यातील तसेच स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीसाठी स्वामीजींनी केलेल्या कार्यामुळे ते सदैव देशवासियांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना आदरांजली वाहिली.