डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दीनदलितांचा ‘लॉकडाऊन’ तोडला-प्रा. श्रीरंजन आवटे

नांदेड ,६ डिसेंबर/प्रतिनिधी:- भारतीय समाजाने दीनदलित आणि अस्‍पृश्‍यांना हजारो वर्षापासून दूर लोटले होते. त्‍यांची संधी नाकारली होती. मात्र समतेचे कट्टर पुरस्‍कर्ते असलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दीनदलितांना ‘लॉकडाऊन’ तोडला, असे प्रतिपादन प्रसिध्‍द युवा लेखक प्रा. श्रीरंजन आवटे (पुणे), यांनी केले. स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्‍यासन व अभ्‍यास केंद्राच्‍या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त आयोजित विशेष अभिवादन व्‍याख्‍यान प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी परीक्षा व मूल्‍यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि एन. सरोदे हे होते. यावेळी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. पंचशील एकंबेकर, व्‍यवस्‍थापन परिषदेचे समन्‍वयक डॉ. गजानन असोलेकर आणि अध्‍यासन केंद्राचे समन्‍वयक डॉ. पी. विठ्ठल हे होते. 

पुढे बोलतांना आवटे म्‍हणाले की, कर्मकांडामुळे भारतीय समाजाला धोका असल्‍याचे त्‍यांनी ओळखले होते. डॉ. आंबेडकरांमुळेच इथे ज्ञानाची आणि समतेची पहाट उगवली. ते कोणत्‍याही एका विशिष्‍ठ जातीचे किंवा धर्माचे नव्‍हते, तर ते सर्व भारतीयांचे होते. आज सर्वत्र व्‍देष, सूड आणि जमातवादाचे राजकारण सुरू असतांना डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.  

यावेळी बोलताना डॉ. रवि एन. सरोदे म्‍हणाले, ‘प्रज्ञा, शील आणि करूणाभाव हे बुध्‍दाचे तत्वज्ञान डॉ. आंबेडकरांनी आपल्‍याला दिले’. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. तत्‍पूर्वी अध्‍यासन केंद्रात विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. उध्‍दव भोसले, प्र-कुलगुरू, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव, डॉ. सर्जेराव शिंदे, डॉ. रवि एन. सरोदे, डॉ. अजय टेंगसे,      डॉ. विठ्ठल परिहार, डॉ. जी. बी. कत्तलाकुटे, डॉ. अशोक कदम, डॉ. डी. एम. तंगलवाड, डॉ. राजेश शिंदे, हुशारसिंग साबळे, उध्‍दव हंबर्डे, काळबा हनवते, सुनिल रावळे, सुनिल ढाले, डॉ. नितिन गायकवाड, नारायण गोरे, शैलेश कांबळे, प्रदीप बिडला, संदीप एडके, मारोती सोनपारखे, हरीदास जाधव, दिनेश हनवते, जनार्दन गवंदे, मनोज टाक इत्‍यादी. मान्‍यवरांनी    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.