नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे ; नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह

नांदेड, दि. 2 :- कोरोना विषाणुची बाधा झालेला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील एक रुग्ण आज बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी दिली. या रुग्णावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्यामुळे या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मंगळवार 2 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 67 अहवालापैकी 60 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 3 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 152 झाली आहे. या तीन रुग्णांपैकी 7 वर्षांची मुलगी, 4 वर्षाचा मुलगा हे रुग्ण लोहार गल्ली नांदेड येथील तर 55 वर्षे वयाचा एक पुरुष रुग्ण कुंभारटेकडी सराफा बाजार नांदेड येथील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 23 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.

आतापर्यंत एकूण 152 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 121 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 23 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 12 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 रुग्ण, मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला एक रुग्ण आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 40 हजार 922, घेतलेले स्वॅब 4 हजार 153, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 546, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 3, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 152, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 155, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 28, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 121, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 23, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 267 एवढी आहे.

दिनांक 1 जून रोजी प्रलंबित असलेल्या 176 स्वॅब तपासणी अहवालापैकी 67 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 109 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 2 जून रोजी 158 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *