विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपची दमदार कामगिरी

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच १० राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकांचा निकालही मंगळवारी जाहिर करण्यात आला. त्यामध्ये ७ राज्यांमध्येही भाजपाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना संकटाचे व्यवस्थापन करण्यात भाजपा सरकारे अपयशी ठरली, या विरोधकांच्या दाव्याला मतदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत भाजपाने ११ जागांवर विजय मिळविला होता तर ८ जागांवर आघाडी कायम ठेवली होती. तर काँग्रेसने केवळ ८ जागांवर विजय प्राप्त करून एका जागेवर आघाडी घेतली होती. त्याचप्रमाणे ८ जागांसाठी झालेल्या गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने सर्वच्या सर्व जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला आहे.
 उत्तर प्रदेशातील ७ जागांपैकी ६ जागा भाजपाच्या पारड्यात तर एका जागेवर समाजवादी पार्टीने विजय मिळविला आहे. तेलंगाणातील एका जागेवर रात्री ८ वाजेपर्यंत भाजपाने आघाडी कायम ठेवली होती. कर्नाटकातील २ जागांवरही भाजपाने विजय मिळविला आहे. मणिपूरमध्ये ३ जागांवर विजय मिळवून एका जागेवर आघाडी कायम ठेवली होती तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

हरियाणातील एका जागेवर काँग्रेसने विजय प्राप्त केला. झारखंडच्या दोन जागांपैकी प्रत्येकी एक एक जागेवर काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने विजय मिळविला. नागालँडमधील दोन जागांवर अनुक्रमे एनडीपीपी आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले तर ओडिशातील दोन्ही जागांवर सत्ताधारी बिजू जनता दलाने विजय मिळविला आहे.