भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांचं ठाकरी स्टाईल उत्तर

वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा, हे रस्त्यावरही करु शकता – उद्धव ठाकरे
‘या दोघां’मध्ये बसलोय, बाहेर कसा येऊ?, भाजप-शिवसेना युतीच्या शक्यतेवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर
एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सवाल

मुंबई ,६जुलै /प्रतिनिधी :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती होणार, नितीश कुमार यांच्या ‘बिहार पॅटर्न’चा अवलंब करत उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत जाणार, असे तर्क लावले जात आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या हजरजबाबीपणा दाखवत रोखठोक उत्तर दिले आहे. तसंच, भाजपचे अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेनं खाली करणारी होती, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे सूप आज वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

तसेच काल विधानसभेत झालेला गदारोळ आणि भाजप आमदारांवर झालेल्या करवाईवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले, काल जे घडले ते अतिशय लाजीरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही. ही आपली परंपरा नाही. या सगळ्या प्रकरणानंतर विधिमंडाळातील कामकाजाचा दर्जा खालावत असल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींकडून जनतेची अपेक्षा असते. माझ्या आयुष्यात काही बदल घडला पाहिजे असे जनतेला वाटते. तसेच हा बदल जिथे घडतो त्या ठिकाणी लोकप्रनिधींना जनता पाठवते. मात्र, काल जे काही दृश्य पाहायला मिळालं ते शरमेने मान खाली जावी असे कृत्य होते हे एका जबाबदार पक्षाने केले, असेही ठाकरे म्हणाले.
 
 
पुढे ठाकरे म्हणाले, “वेडवाकडं वागायचे, आरडाओरडा करायचा. हे करायचे असेल तर रस्त्यावर करु शकता. मात्र, सभागृहामध्ये माईक असतात. माईक ओढायचे हे काही आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. भास्करराव यांच्या दालनात जे काही घडलं त्यातील बरचसे वर्णन त्यांनी केले. ते ऐकल्यानंतर सिसारी यावे असे हे वर्तन आहे. हा देशात तसेच राज्यात पायंडा पडायला नको. त्यासाठी प्रत्येकाना आपली मर्यादा काय आहे, हे समजून घ्यायला हवे.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसलले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भाजप शिवसेना पुन्हा युती होणार अशी चर्चा रंगली आहे असा सवाल पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी दोघांच्या ( अजित पवार, बाळासाहेब थोरात) मध्ये आहे, मला बाहेर निघायचं असेल तर या दोघांना टाळण शक्य आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार टिकेल का या प्रश्नाला ठाकरी स्टाईल उत्तर दिलं.

Image

ईडी आणि सीबीआय लोकशाहीला पांढरा रंग देतंय का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केलाय. आघाडीतल्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाया म्हणजे केंद्राचं दबावतंत्र असल्याचा आरोप मुख्यमंत्री ठाकरेंनी केलाय. केंद्राकडून यंत्रणांचा गैरवापर होतोय असं सांगून शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांना त्यांनी एकप्रकारे पूर्णविराम दिलाय. 

सध्या करोना स्थिती असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात अडसर असल्याचे मी राज्यपालांना कळवले आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर निश्चितपणे प्राधान्याने ही निवडणूक घेतली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीसांना टोला

अधिवेशनात सोमवारी झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत म्हटलं, कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळीमा फासणार आहे. उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.