राज्यामध्ये तेढ; लोकशाही टिकवणे  गरजेचे -शरद पवार 

गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाणांना वंदन करत शरद पवारांची नवी सुरुवात

कराड : काल झालेल्या राजकीय नाट्यानंतर  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराडमध्ये प्रीतिसंगमावर पहिलीच जाहीर सभा बोलावली होती. कालच्या पत्रकार परिषदेत आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण अशी विचारणा झाल्यावर शरद पवारांनी हात उंचावून स्वतःचं नाव घेतलं. आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून नवी सुरुवात करणार असल्याचं शरद पवार म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या आज अनेक समर्थकांनी कराडमध्ये मोठी गर्दी केली होती.

image.png

शरद पवारांनी भाषणाला सुरुवात करण्याआधीच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावर आता कुणाचाच आवाज नको, माझा एकट्याचा आवाज असं सूचकपणे म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांत केलं. आजच्या भाषणात शरद पवारांनी आज असलेल्या गुरुपौर्णिमेचा उल्लेख केल्याबरोबर कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून आला. या गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण यांचं पवारांच्या आयुष्यात असलेलं महत्त्व आणि त्यांचं पवारांच्या गुरुस्थानी असणं याचा पुनश्च उल्लेख केला.

यशवंतरावांचे विचार कायम मनात

सामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार हा जतन केला पाहिजे. देशाच्या विकासामध्ये सर्वसामान्यांचा हातभार लागला पाहिजे. त्यांनी या राज्यांमध्ये नवीन पिढी तयार केली. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तरुणांचा संच उभा केला. त्या माध्यमातून महाराष्ट्रातून प्रगती पथावर नेला. चव्हाणसाहेब आज नसले तरी त्यांचे विचार तुमच्या माझ्या मनात आहेत, असं म्हणत शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केलं.

राज्यामध्ये तेढ; लोकशाही टिकवणं गरजेचं

शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांची शक्ती टिकवणं आवश्यक आहे. त्यांच्या महाराष्ट्रात सामान्य मामूस एकवेळ उपाशी राहील, मात्र सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस राज्यामध्ये तेढ निर्माण होत असून लोकशाही टिकवणं गरजेचं आहे, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले. उलथापालथ करणारी जी शक्ती आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवायला वेळ लागणार नाही. पुढच्या सहा महिन्यांतच या प्रवृत्तींना बाजूला करुन महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीच्या आणि सामान्य माणसाच्या हितासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन, मिळून काम करुयात असं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

शरद पवारांच्या पावसातल्या सभा

शरद पवारांची पावसात झालेली सभा अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. आजच्या सभेदरम्यान पाऊस पडला नसला तरी पावसाच्या दिवसांत हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल शरद पवारांनी त्यांचे आभार मानले. प्रीतिसंगमावरील भाषणानंतर शरद पवार आता सातार्‍यातील रयत शिक्षण संस्थेच्या होणार्‍या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर ते मुंबईत परततील.

पुढच्या अंकात काय घडणार?

अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेले ९ आमदार सोडल्यास कोणाच्या बाजूने किती संख्याबळ आहे, याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. यातच शरद पवारांनी आपण पुन्हा नव्याने सुरुवात करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या राजकीय नाट्याच्या पुढच्या अंकात काय घडणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

शरद पवार यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत 

स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावर येऊन आज चव्हाण साहेबांना अभिवादन केले. चव्हाण साहेबांचे वैशिष्ट्य होते की सामान्य माणसांचा अधिकार जतन केला पाहिजे. या राज्यात त्यांनी नवी पिढी तयार केली. जिल्ह्याजिल्ह्यात तरूणांचा संच उभा केला. या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीची अखंड काळजी घेतली. आज चव्हाण साहेब जरी आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेले विचार हे तुमच्या-माझ्या अंत:करणात आहेत. त्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली.

आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्या न पिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत.

महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात झाले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाण साहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे देण्याचा प्रयत्न होतोय.

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृत्तींनी घेतली. दुर्दैवाने यात आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याला फार अवकाश नाही. वर्षभराने पुन्हा लोकांसमोर जायची संधी येईल. त्यावेळी राज्यातील लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला करूया. पुन्हा एकदा प्रगतीशील आणि सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य आपण निर्माण करूया.

आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनमानस तयार करण्यासंबंधीचा निकाल काल आम्ही घेतला. याची सुरुवात करायची असेल तर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीशिवाय दुसरे स्थळ नाही. तुमचे, माझे, सगळ्यांचे गुरु, या पदावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. त्यांच्या स्मृतिस्थळी याठिकाणी आपण प्रचंड संख्येने आलेत. या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.