गोळी झाडून अपहरण, आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद, दिनांक 9 :-पूर्ववैमनस्यातून हवेत आणि बांधकाम ठेकेदाराच्या मांडीवर गोळी झाडून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना रविवारी दि.8 सायंकाळी गजाआड केले. त्यांच्याकडुन 30 हजार रुपयांची गावठी पिस्तुल व दोन जीवंत काडतुस जप्‍त करण्यात आले आहेत. आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी सोमवारी दि.9 दिले.
अफताब फेरोज तडवी पठाण (21, रा. पटेल प्राईड सादात नगर, रेल्वेस्टेशन), मिर्झा रोमानबेग मिर्झा फेरोजबेग (22, रा. रोषणगेट, न्यू कॉलनी), शेख जावेद शेख गुलाव नबी (31, रा. सिल्कमील कॉलनी, रेल्वेस्टेशन) आणि आवेजखान अखिलखान (21, रा. हमीद कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
देवानगरीतील सार्वजनिक बांधकाम विभाग कॉलनीतील बँक कर्मचारी मदन अवधूत भोसले यांच्या बंगल्याच्या बांधकामाचा ठेका वसीम पठाण रऊफ पठाण यांनी घेतला आहे.  4 नोव्हेंबर रोजी सकाळी वसीम पठाण यांचा भाउ  नदीम पठाण रऊफ पठाण (28, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर) कामगारांसह बांधकामाच्या ठिकाणी होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास कारमध्ये (एमएच-14-सीके-5735) आलेल्या चौघांनी हवेत व नदीम यांच्या पायावर गोळी झाडुन त्यांचे अपहरण केले होते. बांधकामावरील मजुरांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला असता आरोपी भालगावच्या दिशेने गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही माहिती ठेकेदार वसीम पठाण व पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांनी शोध घेतला असता भालगावनजीक अपहरणकर्त्यांची बंद कार (क्रं. एमएच-20-सीके-5735) रस्त्याच्या कडेला दिसून आली. त्यात अपहृत नदीम यांच्या डाव्या पायात गोळी झाडल्याचे पाहिल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. प्रकरणात वसीम पठाण यांच्या फिर्यादीवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान चौघा आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील जरीणा दुरार्णी यांनी आरोपी व जखमी नदीम यांचे आठ दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणावरुन आरोपींनी हा गुन्हा केला. त्यामुळे भांडणाचे नेमके कारण काय होते याचा तपास करणे आहे. नदीमला मारण्याचा कट कोठे व कोणी कोणी रचला. गुन्ह्यात वापरलेली वाहने कोणाची आहेत तसेच गुन्ह्यात आरोपींना कोणी मदत केली याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.