नशेच्या गोळ्या पुरविणार्‍या मुख्य आरोपीला अटक,11 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

औरंगाबाद, दिनांक 09 :

अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री केल्याप्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी नाशिक येथुन गोळ्या पुरविणार्‍या मुख्य आरोपीला सोमवारी दि.9  पहाटे गजाआड केले आहे. केतन उर्फ बाळा रोहिदास गावंडे (24, रा. शिवशक्‍ती कॉलनी, नाशिक) असे आरोपीचे नाव असुन त्याला 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वाडकर यांनी दिले.
गुन्ह्यापूर्वी आरोपी आवेज खान आणि खालेद खान या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघा आरोपींची न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, 29 सप्टेबर रोजी पोलिसांना सापळा रचुन नशेच्या गोळ्या विक्री करणार्‍या आवेज खान याला अटक केली. त्याच्याकडुन 75 हजार रुपये किंमतीच्या गोळ्यांचे 15 बॉक्स पोलिसांनी जप्त केले. प्ररकणात पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कोठडीदरम्यान आवेज याने आरोपी खालेद खान याच्या ओळखीच्या नाशीक येथील इसमाकडुन नशेच्या गोळ्या खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी खालेद खान याला अटक केली. तर खालेद खान याने पोलीस कोठडीदरम्यान आरोपी केतन उर्फ बाला गावंडे याच्याकडून गोळ्या खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गावंडे याला नाशिक येथुन अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता तो नाशिक येथील स्त्रालम सायन्सेस प्रा.ली. मध्ये काम करित असतांना त्याची नाशिक येथील नरेंद्र डिस्ट्रीब्यूटर्स शी ओळख झाली. त्यांना विश्वासात घेवुन आरोपीने समता नगर चौक येथील एका मेडीकल मधुन नरेंद्र डिस्ट्रीब्युटर्सच्या नावे सदरील गोळ्या खरेदी करुन त्या आवेज खान याला विक्री केल्याचे सांगितले.
आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता सदरील गोळ्या आरोपीने नरेंद्र डिस्ट्रीब्यूटर्सकडून घेतल्याने त्याचा तपास करणे आहे. आरोपीने सदरील नशेच्या गोळ्या औरंगाबादेत आणखी कोणाला विक्री केल्या याचा देखील तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस.एम. बेदरे यांनी न्यायालयाकडे केली.