न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय राजकारण प्रवेशाच्या तयारीत; कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. न्यायपालिकेतील कामकाज संपवून त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा इरादा जाहीर केला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार, हे मात्र त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी रविवारी कोलकाता येथील आपल्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांना सांगितले. न्यायमूर्ती गंगोपाध्याय या वर्षाच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यांनी सांगितले की, ते मंगळवारी राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर करतील. त्याच्या प्रती भारताचे सरन्यायाधीश आणि कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवल्या जातील.

न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी राज्यातील शिक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर निर्णय घेतल्याने राजकीय वादविवाद झाले होते. त्यांनी पश्चिम बंगाल सरकार प्रायोजित आणि अनुदानित शाळांमधील अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांना सूचना देणारे अनेक आदेश जारी केले आहेत.