लातूर-नांदेड महामार्गावर चौघांचा जागीच मृत्यू

लातूर,४ मार्च / प्रतिनिधी :-देवदर्शनासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची कार ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील ड्रायव्हरसह चार भाविक जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा भीषण अपघात रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास नांदेड रोडवरील महाळंग्रा शिवारात डी. बी. कॉलेजसमोर घडला.

नांदेड येथील रहिवासी शिवराज लंकाढाई, सोनू कोतवाल, कृष्णा चौधरी, शुभम लंकाढाई हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारमधून तुळजापूरला देवदर्शनासाठी जात होते. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास लातूरजवळ महाळंग्रा शिवारात डी.बी कॉलेजसमोर रोडवर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरवर त्यांची भरधाव असलेली कार आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला असून कारचालकासह चौघेजण जागीच ठार झाले. तर शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला असून त्याला लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.