विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे  यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते. मेटे यांच्या अपघात प्रकरणी सीआयडीने चौकशी केली आहे. त्यानुसार मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात सीआयडीकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातात मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तपासानंतर सीआयडीने कलम ३०४ (२) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघात स्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आले होते.