समृद्धी महामार्ग  बनला मृत्यूचा  सापळा :पाच महिन्यांत ९५ जणांचा मृत्यू

ठराविक अंतरांनंतर थांबण्यासाठी ठिकाणांचा अभाव

मुंबई, दि. ५ मे/प्रतिनिधीः अंशतः पूर्ण झालेला मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेसवे अर्थात समृद्धी महामार्ग मृत्यूचा मार्ग बनला असून अवघ्या पाच महिन्यांत त्यावर लहान मोठे १९५ अपघात झाले असून त्यात ९५ जणांना जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर, २०२२ रोजी ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ टप्पा-१ चे उद्घाटन झाले होते. नागपूर ते नाशिक हे ५२० किलोमीटर अंतर आहे. मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचे अंतर असलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च ५५ हजार कोटी रूपये आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतून जात असून १६ तासांचा प्रवास निम्म्या म्हणजे आठ तासांत होणार आहे. तथापि, कॉन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईटसने (सीबीआर) सध्याचा रस्ताच जवळपास पाच महिन्यांपासून वाहनांसाठी आणि ती चालवणाऱ्यांसाठी जीवघेऊ ठरला आहे, म्हटले आहे.
“सरकारी नोंदीनुसार किमान ९५ जणांचा १९५ पेक्षा जास्त लहानमोठ्या अपघातांत जीव गेला असून कित्येक जण जखमी झाले आहेत,” असे सीबीआरचे अध्यक्ष विनोद तिवारी यांनी सांगितले. या महामार्गावर आणखी जीव गमवायचे नसतील तर तातडीने उपाय योजना करण्याची गरज असल्याचे तिवारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांचे लक्ष वेधून म्हटले.

image.png

पेट्रोल स्टेशन्स, उपहारगृहे नाहीत

या महामार्गावर पेट्रोल स्टेशन्स, उपहारगृहे, स्वच्छतागृहे, मॉल्स, करमणूक इत्यादी असे कोणतेच थांबे नाहीत अशी धक्कादायक माहिती विश्वेशरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (नागपूर) केलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे, असे तिवारी म्हणाले. या अहवालात थोडीही विश्रांती न घेता अनेक तास ड्रायव्हिंग केल्यानंतर चालकांच्या डोळ्यांवर झापड (हायवे हिप्नोसिस) येते व त्यातून अपघात घडतात, असे म्हटले. हायवे हिप्नोसिस ही अशी अवस्था आहे की, त्यात चालकाला एका ठराविक वेळेत नेमके काय घडले ते आठवत नाही, स्टीअरिंगवर पूर्ण ताबा नसताना तो वाहन चालवत असतो व त्याच्या किंवा तिच्या आजुबाजुला जे घडत असते त्याकडे त्याचे लक्ष नसते. नीरस, कंटाळवाणे महामार्ग, झोपेची गुंगी, गाफील मेंदू इत्यादी आणि चालकाने अनेक तास वाहन चालवल्यावर खूप थकल्यानंतरचे अपघात हे दुष्परिणाम आहेत.

हायवे हिप्नोसिस कारणीभूत

image.png

व्हीएनआयटीच्या ट्राफिक इंजिनियरींग डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी नागपूर-नाशिक विभागाच्या १०० किलोमीटर अंतराचा अभ्यास केला. या मार्गावरील एकूण अपघातांच्या एक तृतीयांश घटनांत हायवे हिप्नोसिस कारणीभूत ठरल्याचे दिसते, असे विभाग प्रमुख व्ही. लांडगे म्हणाले. सुपर एक्स्प्रेसवे एकाच मार्गावर तीनपदरी असल्यामुळे समोरासमोर अपघाताची शक्यता नाही पण ५० टक्क्यांपेक्षा जास्त ट्रकचालक हे नो लेन चेंज नियमांचे पालन करीत नाहीत. या मार्गावरील वाहतुकींत ३० टक्के छोटी वाहने, २० टक्के मालवाहू वाहने, ५० टक्के ट्रक्स आहेत. ट्रकचालकच लेन चेंज नियमांचे पालन करीत नाहीत व त्यामुळे लहान मोठे अपघात होतात, असे हा अहवाल म्हणतो.

पाश्चिमात्य देशांत सर्व महामार्गांवर १२०-१२५ किलोमीटर अंतरावर चालकांना १२०-१५० मिनिटांच्या सततच्या ड्रायव्हिंगमुळे छोटी विश्रांती घेण्यासाठी थांबे उपलब्ध असतात, असे तिवारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना म्हटले.