महिलांमार्फत माझ्यावर हल्ल्याचा फडणवीसांचा कट- मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांचा आरोप

बीड,४मार्च  / प्रतिनिधी :-महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कट आखला आहे, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

ते म्हणाले की, फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आखला आहे. हा प्रकार सुरुवातीला संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, माझ्यावर हल्ला करणे हे गृहमंत्र्यांना शोभत नाही. मी हॉस्पिटलमधून बाहेर का आलो? दवाखान्यात ॲडमिट असल्यावर चौकशी होत नाही. लोक चौकशीसाठी दवाखान्यात पळून जातात, पण मी मुद्दाम एसआयटीच्या चौकशीसाठी बाहेर आलो, असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी बीड जिल्ह्यातील वानगाव फाटा येथील बैठकीआधी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांनी पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल त्यांनी आहे.