५० कोटी घेतल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटा विरोधात तपास सुरू

मुंबई,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात कथित फसवणूक प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ठाकरे गटाने शिवसेना पक्षाच्या निधीतून ५० कोटी बेकायदेशीरपणे घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात शिंदे गटाच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या आधारावर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाने पक्ष निधीतून ५० कोटी रुपये काढून घेतल्याची तक्रार शिंदे गटाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत केली होती. शिंदे गटाने पक्षाच्या तपशीलांचा गैरवापर करत फसवणूक करत असल्याचा दावा तक्रारीत केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. सोबतच आर्थिक गुन्हे शाखेने आयकर विभागाला देखील पत्र लिहून ठाकरे गटाचा कर कोण भरत आहे याची माहिती मागितली आहे.