सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त: तब्बल ३३०० किलो अंमलीपदार्थ पकडले

भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाची समुद्रात अंमली पदार्थ विरोधी मोहीम

मुंबई,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर एटीएस, नार्कोट्रिक कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कारवाई करत आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. समुद्रात फिरणाऱ्या संशयास्पद बोटीतून कोट्यावधी रुपयांचं अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. तब्बल ३३०० किलो वजनी ड्रग्जचा साठा पकडण्यात आला असून ५ विदेशी तस्करांना अटक करण्यात आलीय. भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.

भारतीय तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीने ड्रग्जचा साठा पकडण्यासाठी अरबी समुद्रात सापळा रचला होता. या ड्रग्जमध्ये चरस (३०८९ किलो), मेथॅम्फेटामाइन (१५८ किलो), आणि मॉर्फिनचा (२५ किलो) समावेश असल्याची माहिती समोर आलीय.बोटीतून समुद्रीमार्गे ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ५ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. हे पाच आरोपी इराणी किंवा पाकिस्तानी असल्याचा संशय एनसीबीला आहे.या ओरपींकडे देशाचे नागरिकत्व दर्शवणारे कोणतेही कागदपत्रे नाहीत, 

या नौकेला रोखून  अलिकडच्या काळात अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे.  त्यानंतर, ताब्यात घेण्यात आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने जवळच्या भारतीय बंदरात खेचून नेले आणि त्यावरील कर्मचारी तसेच प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा कायदे अंमलबजावणी संस्थेच्या हवाली केला.

ही कारवाई केवळ जप्त केलेल्या अवैध मालाचे प्रमाण आणि मूल्य  या दृष्टीनेच महत्वपूर्ण आहेच शिवाय मकरान किनाऱ्यावरून निघणाऱ्या आणि विविध दिशांना तसेच हिंद महासागर क्षेत्रातील देशांना जाणाऱ्या प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीचे मार्ग ध्वस्त करण्यासाठी भारतीय नौदल आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्रयत्नांना अधोरेखित करते.

ही यशस्वी समन्वित मोहीम, विशेषत्वाने भारताच्या सागरी सीमा क्षेत्र परिसराचा बेकायदेशीर कृत्यांसाठी वापर करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय नौदलाची मजबूत वचनबद्धता  आणि संकल्प अधोरेखित करते.