महालगाव येथे चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार महिन्यापासून जबरदस्तीने अतिप्रसंग करणारा आरोपी अभिषेक तात्यासाहेब सोमवते ऊर्फ अक्ष्या (रा. बाजारतळ महालगाव) यांच्याविरोधात वीरगाव पोलीसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. पिडित मुलीला काही दिवसापासून पोट दु:खाचा त्रास होत असल्यामुळे आजीने तिला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते.तपासणी दरम्यान डॉक्टरांनी पिडित मुलीला दिवस गेल्याचे सांगितल्यानंतर घरासमोर राहणा-या तरुणांकडून सातत्याने शारीरिक अत्याचार केला जात असल्याची माहिती पिडित मुलीने पोलीसांना दिली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 14 वर्षीय पिडित मुलगी आजी, मामा व मामी यांच्यासोबत महालगाव येथील बाजारतळ परिसरात वास्तव्यास आहे.चार महिन्यापूर्वी गावाजवळील ओढयाकडे ती एकटी सरपण जमा करीत असताना घरासमोर राहणा-या आरोपी अभिषेक तात्यासाहेब सोमवते यांने तिला एकटी गाठून बळजबरीने उसाच्या फडात नेले व तिच्यावर बलात्कार केला.

हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला मारुन टाकील असे त्याने धमकावले होते. त्यानंतर या तरुणाने  पिडित मुलीला मी तुझ्या सोबत लग्न करणार असे गोड बोलून तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग करत होता.पिडिताला पोट दु:खीचा त्रास सुरु झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती करीत आहेत.