जरांगे नरमले:आमरण उपोषण घेतले मागे;आजपासून साखळी उपोषण

बीड जिल्ह्यात शिरूर कासार व अंमळनेर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच उपोषण मागे…

छत्रपती संभाजीनगर,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-मराठा आरक्षणासंबंधी जीआर काढल्यानंतर असमाधानी असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. यानंतर सरकारने मराठा समाजाला१० टक्के आरक्षण देऊनही मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. याउलट ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर उलटसुलट आरोप केले. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जरांगेंना चांगलेच धारेवर धरले. यानंतर आज उपोषणाच्या सतराव्या दिवशी जरांगेंनी आपलं आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. तर आजपासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे.दुसरीकडे, जरांगे यांची विधाने आणि आंदोलनाचे इशारे याविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.  

मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

अंबडमध्ये संचारबंदी लागू केल्याने लोकांना त्यांना भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता मराठा बांधवांच्या भेटी घेण्यासाठी ते स्वतः जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासाठीच त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. गावातील मराठा भगिनींच्या हातून रस पिऊन ते उपोषण मागे घेणार आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

“मराठ्यांपुढं प्रेमाचं ताट ठेवा, विषारी ठेऊ नका, नाहीतर…”; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

“देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं की काल दंगल व्हायला पाहिजे होती. तुम्ही बंगल्यात लपून बसला असता पण राज्य बेचिराख झालं असतं. पण मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे. मराठ्यांपुढं प्रेमाचं ताट ठेवा, विषारी ठेऊ नका. नाहीतर याचे परिणाम देवेंद्र फडणवीसांना भोगावे लागणार आहेत. मी राज्य बेचिराख झाल्यापासून वाचवलं आहे. सत्ता इंग्रजांसारखी चालवायची की निजामशाही पद्धतीनं चालवायची ते त्यांच्या हातात आहे. पण राज्यात मराठ्यांची लाट पुन्हा उसळणार, हे लक्षात ठेवा. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसांनी केला. केसेस अजून मागं घेतल्या नाहीत. काल काही झालं असतं तर मराठा समाज पेटून उठला असता.” असा घणाघात जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मराठ्यांचं आंदोलन सुरुच ठेवणार आहे. संचारबंदीमुळं लोकांना येता येत नाही. मी सूखरुप आहे. महाराष्ट्रात अफवा पसरवू नका. मी एकदम व्यवस्थित आहे, एक दोन दिवसात उपचार घेऊन मी गावागावात संवाद साधणार आहे. लोकांशी संवाद साधण्याचा लोकशाहीत मुलभूत अधिकार आहे. साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करण्याचाही अधिकार आहे.”

जरांगे पुढे म्हणाले, “विनापरवाना रास्ता रोको करण्यासाठी तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे म्हणाले, मी भीत नाही, समाजासाठी काम करतो. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, नोंदी करा. गुन्हे मागे घ्या. जनतेला वेठीस धरु नका. डाव आखण्याचा प्रयत्न करु नका. तुम्हाला संधी आहे आता. निष्पाप लोकांना बाहेर काढा. मला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. त्यांना जनतेची गरज असल्यास ते आम्हाला भेटायला येतील. सरकार आता १२-१३ दिवस आहे मग जनतेच्याच हातात आहे. राजकारण माझ्या डोक्यात नाही. असतं तर यांची सर्व उमेदवार पाडले असते.

कितीही नाटकं केली तरी ओबीसीतूनच आरक्षण मिळणार. आम्ही तुम्हाला आहो जाओ केलं, तुम्हाला मायबाप म्हटलं, त्यात शिंदे साहेब असतील, फडणवीस असतील. पाच महिने सन्मानच केला. लोकांचं ऐकावं लागतं तरच आदर मिळतो. गृहमंत्री पदाचा गैरवापर करुन पोलिसांना आदेश देतात. रात्री डागं लागला असता तर राज्य पेटून उठलं असतं. सग्यासोयऱ्यांची अमलबजावणी करा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील,” असंही जरांगे म्हणाले.

जरांगे यांनी प्रत्येक गावात दररोज ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याआधारे बीड जिल्ह्यात शिरूर कासार व अंमळनेर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर राज्यभरात गेल्या काही महिन्यांत एक हजार ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.  मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान गेल्या काही दिवसांत सुमारे ८० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी किरकोळ स्वरूपाचे ३६ गुन्हे आहेत.

सरकार विरुद्ध जरांगे संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मराठवाडय़ाच्या काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. अंबड तालुक्यातील तीर्थपुरी गावात जमवाने एसटी बस पेटवून दिली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यांतील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली असून त्याचा फटका सामान्य व्यवहारांनाही बसत आहे.