ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठीची प्रक्रिया तत्परतेने राबवा – केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर,३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने राबवावी, असे निर्देश केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासंदर्भात डॉ. कराड यांनी आढावा घेतला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सु.प. काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते. सहा. आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख डॉ. विजय वीर, प्रशासप समितीचे सदस्य विष्णू रोडगे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत माहिती दिली.

बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधिकाऱ्यांनी संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. सहकार विभागाने संस्थेचे लेखापरीक्षण, संस्थेच्या कर्जांची माहिती, त्यांची वसुली व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.