गहिनीनाथ गडावरचा सेवेकरी म्हणून आलो आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड,३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री म्हणुन नव्हे तर इथला एक सेवेकरी म्हणुन आलो असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केल्या.

पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 48 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

या पुण्यतिथी  महोत्सवाच्या कार्यक्रमात मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, उत्तम स्वामी, जिल्‌हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, सर्वश्री आमदार बाळासाहेब आजबे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे आणि जयदत्त क्षीरसागर माजी आमदार भिमराव धोंडे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर  तसेच  भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मागच्यावर्षी मला ध्वज हातात देऊन सेवेकरी केले होते. मी आपल्या मधलाच एक सेवेकरी आहे. इथल्या विकास कामांसाठी यापूर्वी 25 कोटीचा निधी दिलेला आहे. गरज पडल्यास पुन्हा 25 कोटींचा निधी देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या ठिकाणी सुसज्ज स्वागत कमान, किर्तन मंडप, प्रसाद कक्ष बांधले जाईल. श्री संत वामनभाऊ महाराजांवर प्रेम करणारे गरीब सेवेकरी या ठीकाणी एकत्रित येतात त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाईल. या जिल्ह्याला गडांचा समृध्द वारसा आहे. येथे नारायणगड, मच्छिंद्रगड, भगवानगड असे पवित्र तीर्थस्थळे आहेत. या सर्व मार्गावरून वारी जात असते. हा मार्ग चांगला होईल याची दक्षता घेतली जाईल. गहिनीनाथ गडावरुन पालखी जात असते. वारीच्या समयी वारकरांसाठी पंढरपूर येथे जागा मिळाली असून जागा दान देणारे आज आपल्या मध्ये आहेत हा सुवर्ण क्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आहे. याप्रसंगी भाविकांवर टाळ मृदंगाच्या गजरात  मंचावरून पुष्पवृष्टी करण्यात आली.

गहिनीनाथ गडाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करता येते : पालकमंत्री धंनजय मुंडे

बीड जिल्हा अध्यात्माचा  जिल्हा असून अनेक संत महात्मे या मातीत जन्माला आले आहे. गहिनीनाथ गड हे असेच स्थान आहे. या गडावरील  श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्याने ही जमीन पुनीत झाली असून येथे भाविकांची सेवा मला करता येत असल्याचे पालकमंत्री  धंनजय मुंडे यावेळी म्हणाले.

इथल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करण्याचा मान आमच्या कुंटुबियांचा आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. वारकरी संप्रदायाची सुरूवात या ठिकाणपासून झाली हे येथील वैशिष्ट्य आहे. या गडाला मोठे करण्याचे काम येथील गोर गरीब जनतेने केले आहे. इथले विकास काम पूर्ण होऊन भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात हा माझा प्रयत्न असल्याचे ही त्यावेळी म्हणाले.

जातीतील अंतर कमी करण्याचे काम संतानी तसेच संविधानाने केले : ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीजातीतील अंतर कमी करण्याचे काम संत महात्म्यांनी या मातीत केलेले आहे हे कार्य संविधानातूनही झाले असल्याचे प्रतिपादन ॲड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रसंगी केली. छत्रपती  शिवाजी महाराजांनी या  मावळयांच्या मदतीने स्वराज स्थापन केले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जाती व्यवस्था संपवली होती. माणसं ही माणसं म्हणुनच जगली पाहिजे. हीच बाब संविधानातून भारतीय म्हणुन आपल्याला मिळाली आहे. जोपर्यंत जाती अंत होत नाही तो पर्यंत माणुसपण निर्माण होऊ शकत नाही, असे ही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार प्रितम मुंडे यांनी केले यावेळी माजी मंत्री जयदत्त  क्षीरसागर यांनाही यावेळी मनोगत व्यक्त केले.