हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष:विविध उपक्रमातून मांडणार मुक्तीसंग्रामाची स्फुर्तीगाथा-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,२७ जुलै /प्रतिनिधी :-जिल्हा, महानगरपालिका, तालुका ते गावपातळीपर्यंत विविध उपक्रम राबवून हैदराबाद  मुक्तीसंग्रामाची स्फूर्तीगाथेचा जागर करण्यात येणार आहे. ही स्फूर्तीगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी यासाठी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामिण भागातही हे उपक्रम राबविता यावे, यासाठी तालुकास्तरावरुनही विविध कार्यक्रमांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज यंत्रणेस दिले.

हैदराबाद  मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, कार्यकारी अभियंता सांबावि येरेकर,जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ,सहा.वनसंरक्षक आशा चव्हाण तसेच दुरदृष्यप्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते.

यासंदर्भात शासनाने दि.7 जुलै रोजी स्वतंत्र शासन निर्णयही निर्गमित केला आहे. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी बाबनिहाय माहिती उपस्थितांना दिली. त्यात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व अनुभवकथन कार्यक्रमाचे आयोजन,  देशभक्तीपर गीत, पथनाट्याद्वारे मुक्तीसंग्रामाचा इतिहास मांडणे, मंडलनिहाय चित्ररथाद्वारे माहिती पोहोचविणे, रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, स्वच्छता रॅली,  मुक्तीसंग्रामाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेटी, तेथे श्रमदान करुन स्वच्छता करणे, गौरव यात्रा काढून स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करणे,  इ. विविध कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावरुन तसेच ग्रामीण भागात तालुका पातळीवरुन नियोजन करावे. छत्रपती संभाजीनगर  शहरातही महापालिकेने उपक्रम राबवावयाचे आहेत. जिल्हा परिषद यंत्रणेमार्फतही उपक्रम राबवावयाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.