कारगील दिनाच्या निमित्ताने विजय स्मारकाचे उद्घाटन 

छत्रपती संभाजीनगर,२७ जुलै /प्रतिनिधी :-२०००-२००१ मध्ये नगर नाका येथे चौकात बांधण्यात आलेले शहीद स्मारक वाढत्या वाहतुकीमुळे अडचणीचे ठरत होते. तसेच चौकामधे असल्यामुळे त्याचे पावित्र्य राखणे अवघड झाले होते. विशेष दिवशी तेथे श्रद्धांजली वाहणे सुद्धा जिकीरीचे व धोकादायक झाले होते. 

शहराचा पर्यावरण पूरक व सर्वांगीण विकासासाठी काम करणारे नागरी संघटन “छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) फर्स्ट” या संस्थेने हा विषय स्थानिक प्रशासन व वाहतूक पोलिस यांच्या समोर सातत्याने मांडला. त्याचा परिणाम म्हणून वाहतूक पोलिस विभागाने स्थानिक सैन्य प्रशासनाला सदर स्मारक बाजूला उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत स्थलांतरीत करून घ्यावे असा अहवाल व विनंती ऑगस्ट २०२१ मध्ये  सादर केली. 

शहर वाहतूकीसाठी स्थलांतरणाचे महत्व. सरकारी कारवाईत शक्य असलेला उशीर व स्वतः घेतलेला पुढाकार हे लक्षात घेता स्थलांतरणाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) फर्स्ट ने घेतली. दोन वर्षे सातत्याने सैन्य प्रशासना बरोबर पत्रव्यवहार व पाठपुरावा करून त्यांची परवानगी मिळवली. जागा निश्चित केली आणि सर्व कारवाईचा सैन्य प्रशासना सोबत संयुक्त लेखी करार केला. 

एमजीएम विद्यापीठ यांच्या “आयाम” या वास्तूशास्त्र विभागाने स्मारकाचा आराखडा तयार केला. आराखडा सैन्य प्रशासना कडुन मान्य करून घेतला गेला. 

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था ह्यांनी स्थलांतरणासाठी अर्थ सहाय्य केले. त्यांच्यातर्फे वास्तुविशारद योगेश देवडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थलांतरणाचे कार्य पूर्ण करण्यात आले. 

२० जानेवारी २०२३ रोजी झालेल्या भुमिपुजनाच्या दिवशी  ब्रिगेडियर के. एस. नारायणन यांनी सूचित केल्याप्रमाणे शहीद स्मारकाचे ‘विजय स्मारक’ असे नामांतर करण्यात आले.

मे २०२३ मध्ये  स्मारक पूर्ण झाले. बुधवार २६ जुलै २०२३ कारगील दिनाच्या निमित्ताने विजय स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. देशासाठी धारातिर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच कारगील युद्धातील स्थानिक युद्धविरांचा सन्मान करण्यात आला.

उद्घाटन ब्रिगेडियर के.एस. नारायणन, एडम कमांडंट कर्नल डी. एस. ओबेरॉय, प्रशांत देशपांडे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) फर्स्ट व डॉ. शांतीलाल सिंगी अध्यक्ष वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था यांच्या हस्ते करण्यात आले.‌

या प्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू अंकुशराव कदम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) फर्स्ट चे माजी अध्यक्ष रणजित कक्कड, उपाध्यक्ष अनिल माळी, डॉ. सुनील देशपांडे, सचिव रितेश मिश्रा, कार्यकारी सचिव हेमंत लांडगे, ललित जाधव, संचालक व सदस्य उपस्थित होते मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, एमजीएम विद्यापीठाच्या वास्तुशास्त्र विभागाचे प्रमुख सुनील पाटील व प्राध्यापिका मधुरा कुलकर्णी, वर्धमान पतसंस्थेचे संचालक, इतर सैन्य अधिकारी व शाळकरी मुले यांची विशेष उपस्थिती होती. 

शासकीय अधिकाऱ्यांमध्ये सहायक पोलिस आयुक्त वाहतूक संपत शिंदे, मुख्य प्रशासकीय अधिकारी छावणी परिषद संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अशोक येरेकर उपस्थित होते.‌