महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा-केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून  पाणीपुरवठा, महामेट्रो, गॅस पाईपलाईन कामांबाबतचा आढावा

छत्रपती संभाजीनगर,२६ डिसेंबर / प्रतिनिधी :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा, महामेट्रो प्रकल्प, गॅस पाईपलाईन योजना आदी महत्त्वाच्या विकास कामासंदर्भात आढावा घेतला.

स्मार्ट सिटी कार्यालय येथे आयोजित बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, जीवन प्राधिकारचे प्रमुख अधिकारी तसेच मनपा पाणी पुरवठा यंत्रणेचे संबंधित अधिकारी यांच्यासह गॅस पाईपलाईन यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा, महामेट्रो प्रकल्प, गॅस पाईपलाईन योजना आदी महत्त्वाच्या विकास कामाला गती देत सदर प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश सबंधित यंत्रणेतील अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना दिले.

डॉ. कराड म्हणाले, महानगरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महानगरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत वेळेत व गतीने पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले.

महानगरातील गॅस पाईपलाईन योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. गोदावरी नदी पात्राखाली 20 मीटर खोल पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अहमदनगर, नेवासा फाटा, गंगापूर, वाळूज मार्गे महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, तसेच गॅस पाईपलाईनच्या कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.