समृध्दी महामार्गालगत वैजापूर तालुक्यातील जांबरगांव शिवारात 25 एकर जागेवर शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी

जफर ए.खान

वैजापूर ,२० ऑक्टोबर:

शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक आणि ई लिलावद्वारे आपला शेतीमाल देशाच्या कानाकोपऱ्यात विक्री करता यावा यासाठी बाळासाहेब समृद्धी महामार्गालगत भव्य आणि अत्याधुनिक धान्य साठवणुकीची गोदामे आणि शीतगृहे उभारण्याचा निर्णय राज्य वखार महामंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जांबरगांव (ता.वैजापूर), सावरगाव (ता.सिंदखेडराजा) व रेणुकापूर (आर्वी जि. वर्धा) या तीन ठिकाणी ही गोदामे बांधण्यात येणार आहे.

Displaying IMG_20211016_132355.jpg

आवक वाढली की बाजारभाव कोसळतात त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व समृध्दी महामार्गावर गोदामे उभारण्याचे वखार महामंडळाचे प्रयत्न असून गोदामे उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.वैजापूर तालुक्यातील जांबरगांव शिवारात 25 एकर गायरान जमीन ताब्यात घेऊन या जागेवर अत्याधुनिक सुविधा असलेल्या या ‘ऍग्रो लॉजिस्टिक पार्क’चे काम सुरू झाले आहे.भविष्यातील गरजा विचारात घेऊन या गोदामांची उभारणी करण्यात येत आहे.

अत्याधुनिक सुविधा असलेल्या या”ऍग्रो लॉजिस्टिक पार्क” मध्ये शेतीमाल साठवणुकीनंतर शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतील. गोदामात ठेवण्यात आलेल्या शेतीमालावर त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी याठिकाणी बँकही असेल.प्रशिक्षण केंद्रांची सुविधा राहणार असून,वाहतूकदारांसाठी तळ ही असतील.शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या या कृषी समृध्दी केंद्रात 1 हजार 800 टनाची सहा गोदामे असतील.ही गोदामे सौरऊर्जेच्या वापराने स्वयंपूर्ण राहणार असून धान्य तपासणी प्रयोगशाळा व 2 हजार टनाची शीतगृहे असतील.

सर्व गोदामे आणि शीतगृहे ‘ई-नाम’ शी जोडण्यात येणार आहेत. हमीभाव खरेदी केंद्र व जिनिंग-प्रेसिंग युनिट ही याठिकाणी असेल.बाळासाहेब ठाकरे समृध्दी महार्गालगत वैजापूर  तालुक्यात जांबरगांव शिवारातील 25 एकर जमीन  राज्य वखार महामंडळाने ताब्यात घेऊन या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून गोदामांची कामे सुरू केली आहे. गोदामांची कामे अर्धवट अवस्थेत असून, गेल्या दोन-तीन महिन्यापासून काम बंद असल्याचे समजते.