दानवे उठले, चष्मा काढला आणि भूमरेंवर चांगलेच भडकले ; छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तुफान राडा

छत्रपती संभाजीनगर,७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- जिल्हा नियोजन समितीत मोठा राडा पाहायला मिळाला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा क्षेत्राचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी निधी कमी मिळत असल्याचा आरोप केला. यानंतर या दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये राडा झाला. यावेळी राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भूमरे व मंत्री अब्दूल सत्तार यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यामुळे जिल्हा नियोजन बैठकीचं वातावरण चांगलं तापलं होतं.

जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीत विकास निधी पावटपावरुन चांगलाच वाद झाल्याचं दिसून आलं. ठाकरे गटाचे कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी या बैठकीत त्यांच्या विधानसभा क्षेत्रासाठी कमी निधी मिळाल्याचा आरोप केला होता. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यावर चांगलेच भडकले. “पालकमंत्री म्हणजे जहांगीर नाही”, असा म्हणत दानवे यांनी भूमरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. यावेळी भूमरे यांनी देखील “हो आमची जहांगिरी आहे”, असं प्रत्युत्तर दिलं.

भूमरे यांनी असं प्रत्युत्तर दिल्यानर दानवे चांगलेच चिडले. ते जागेवर उभे राहिले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर दानवे यांनी आपला चष्मा काढून टेबलावर ठेवला. आणि भूमरे यांच्यावर आणखी जोरदार हल्ला चढवा. यावेळी भुमरे यांच्या मदतीला अब्दुल सत्तार धावून आले. यामुळे तिघांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याने या ठिकाणचं वातावरण चांगलचं तापलं.