मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही-संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे

गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळणे मुलभूत अधिकार – साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर जि. जळगाव,२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे. पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी  आपण आग्रही असताना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे, असा प्रश्न पडतो, असे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी उपस्थित केला आहे.

प्रा.डॉ.रवींद्र शोभणे पुढे म्हणाले, साहित्याने काळासोबत चालावे, असे म्हटले जाते. अर्थात यात दोन प्रकार संभवतात. पहिला म्हणजे अगदी समकालिन, वर्तमानकालिन, वर्तमानकालिन समाजवास्तव रेखाटणारे साहित्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बदलत्या काळाचा, वर्तमानाचा विचार न करता, मानवी नात्यातील सनातन मूल्ये आपल्या प्रकृतीने मांडणारे लेखन. अर्थात समकालाचे, वर्तमानाचे साहित्यात चित्रण करताना मानवी नात्यातील सनातन मूल्ये येत नाहीत, असे कुणीही समजू नये. पण काही लेखक समाजातील बदलांकडे पूर्णत: पाठ फिरवून लेखन करतात. अर्थात अशा प्रकारचे लेखन कमअस्सल असते, असेही मानता येणार नाही. 

मराठी साहित्यात नव्या, ताज्या विषयांना मराठी नाटकांनी अधिक प्राधान्याने रसिकांसमोर आणले. यात अनिल बर्वे हा नाटककार, कादंबरीकार अग्रेसर होता. 

साठोत्तरी प्रवाह : नव्या वाटा

मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्याचा मोठा प्रवाह वेगाने आला आणि संपूर्ण जाणकार वाचकांचे, रसिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. युगानुयुगांपासूनची ठसठसती वेदना, दु:ख त्या साहित्यातून व्यक्त होऊ लागले. त्यात व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने इथल्या पारंपरिक मूल्यांना जबरदस्त हादरे देत हे साहित्य एका दशकाच्या आतच प्रस्थापित झाले. या साहित्याचा अमोघ वेग आणि जीवनानुभव पाहता श्रेष्ठ, भारतीय पातळीवरची महाकादंबरी दलित साहित्यातूनच जन्माला येईल, असा विश्वास अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता. पण जवळजवळ 50 वर्षे उलटूनही या अपेक्षा मात्र त्या साहित्याने पूर्ण केल्या नाहीत, असे तटस्थपणे विचार करता म्हणावे लागते. काही लक्षवेधी कादंबऱ्या नक्कीच या साहित्याने दिल्या. त्या सगळ्यांचा आदराचा विषयही ठरला. 

भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न महत्त्वाचे 

जागतिकीकरणाने मराठी भाषासुद्धा शिल्लक राहील की नाही, अशी भीती वर्तविली जाते. या जागतिकीकरणाने जगाच्या पाठीवरील किती बोली संपल्या आणि किती बोली संपायच्या मार्गावर आहेत, याची मोजदाद भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या देशीवादाच्या निबंधात केली आहे. व्यवहाराची भाषा अणि बोलण्याची वेगळी बोली अशी आपल्या बहुतेक समाजाची स्थिती आहे. व्यवहाराच्या भाषेसोबतच उपजीविकेची भाषा अशीही वर्गवारी करावी लागेल. जागतिक बाजारपेठेत तुम्हाला ती भाषा वापरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न अधिक प्रमाणात महत्त्वाचे असतात. जागतिकीकरण आल्यामुळे खरंच आपल्या भाषा संपणार आहेत का? यावर विचार होणे गरजचे आहे.

काही अपवाद सोडला तर बहुतेक मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या बंद पडलेल्या आहेत. काही आहेत तर त्यात कथा, कविता छापणे बंद झाले आहे. आता कथा-कविता कोण वाचतं? म्हणून वृत्तपत्रांचे मालक प्रश्न विचारतात. बालविभाग बहुतेक बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयात एकांकिका, नाटकांचे प्रयोग बंद झाले आहेत. तेथे पाश्चात्य धर्तीवरील कार्यक्रमांची रेलचेल असते. ग्रंथालयांची स्थिती आणखीच वाईट आहे. याचा संमिश्र परिणाम म्हणून आज मराठी भाषेची, संस्कृतीची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते, असेही प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी स्पष्ट केले.

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी,  अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे.‌ तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी‌ शासनाची आहे तसी आपल्या सर्वांची आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी आज येथे व्यक्त केले.

संमेलनाध्यक्ष श्री.शोभणे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा, लेखक, धर्म, संस्कृती, परंपरा व आजच्या तरूणाईचे प्रश्न याविषयी मत मांडले. ते म्हणाले की, मराठी साहित्य व भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटक, संस्थांची जबाबदारी आहे. प्रसार माध्यमांनी ही मराठी भाषा व व्यवहाराला अग्रक्रम देण्याची गरज आहे. अभिरूची वाढविणारे दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी दृकश्राव्य वाहिन्यांवरील निर्मात्यांची आहे. तसे वृत्तपत्रांतून दर्जदार मजकूर देण्याचं काम संपादकांचे आहे. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठी साहित्य जगताचा विचार करताना नव्या पिढीकडून आशा पल्लवित होत आहेत. आपल्या अनुभवांना वेगवेगळ्या आकृतिबंधात मांडत आपला शोध घेणारी म्हणून नवी पिढी आज काही लक्षवेधी लेखन करीत आहे. भारतीय लोकशाहीतील आधारस्तंभ असलेल्या संसद व राज्य विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात साहित्य, कलावंतांची त्यांच्या राखीव जागेवर वेळोवेळी निवड होणे गरजेचे आहे. अशी‌ अपेक्षाही साहित्य संमेलनाध्यक्ष श्री. शोभणे यांनी व्यक्त केली.