मुंबई महापालिकेचा ५९,९५४.७५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

पायाभूत सुविधांसह प्रदूषण नियत्रंणावर मुंबई मनपाचा अर्थसंकल्पात भर

सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर

यावर्षी १०.५० टक्क्यांनी वाढ, महत्वाच्या विकास प्रकल्पांवर विशेष भर

मुंबई : मुंबई महापालिकेचा २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प शुक्रवारी महापालिका आयुक्त तसेच प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. गेल्या अर्थसंकल्पापेक्षा यंदा अंदाजित अर्थसंकल्पात १०.५० टक्क्यांनी वाढ झाली असून मुंबई महापालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ५९ हजार ९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. यामध्ये महसुली उत्पन्न ३५ हजार ७४९ . ०३ कोटी असून भांडवली उत्पन्न ८०४. ८५ कोटी दर्शविले आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी विविध पायाभूत सुविधा, विकासकामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १०.५० टक्क्यांनी अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ५४ हजार २५६.०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मागील वर्षी सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेला चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मालमत्ता करापोटी पालिकेला ३१ जानेवारीपर्यंत ५ हजार ४०० कोटी रुपयांपैकी केवळ ६०५.७७ कोटी रुपये मिळाले आहेत. यात जमेची बाजू म्हणजे विकास नियोजन खात्याला मिळालेल्या महसुलामुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे. चालू वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत ४ हजार २८.१८ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. या वर्षात विकास नियोजन शुल्कापोटी ४ हजार ४०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र ते सुधारून ५,५०० कोटी रुपये करण्यात आले होते. त्याचबरोबर मुदत ठेवींमधील गुंतवणुकीपोटी २२०६.३० कोटी रुपये पालिकेला मिळाले आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर मुख्य भर देण्यात आला आहे. मुंबई स्वच्छ, हिरवीगार आणि जगण्यासाठी आकांक्षी ठेवण्यासाठी नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३१,७७४.५९ कोटींची सर्वोच्च पायाभूत सुविधा तरतूद करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रम’ डिसेंबर २०२३ पासून हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेला मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेने ६१ गुणांची मानक कार्यप्रणाली विकसित केली आहे.

भांडवली खर्चासाठी व नवीन बस गाड्या घेण्यासाठी बेस्टला ९२८ कोटींची मदत

निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, वीज खरेदीसाठी व नवीन विद्युत बस प्रवर्तनात आणण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात बेस्टसाठी या वर्षात ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वीज खरेदी, भाडेतत्त्वावरील बस घेण्यासाठी, कर्जाची परतफेड, दैनंदिन खर्च, आयटीएमएस प्रकल्प, कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान यासाठी यंदाच्या पालिका अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर २ हजार विद्युत बस आणण्याचा प्रस्ताव असून या प्रकल्पाचा एकूण खर्च २ हजार ५७३ कोटी इतका आहे त्यातील १ हजार ८०१ कोटी इतकी रक्कम जागतिक बँकेकडून कर्ज रुपात घेण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून ६४३ कोटी रुपये देणार असून १२८ कोटी रुपये मुंबई महापालिका देणार आहे. त्यानुसार ८०० कोटी व अधिकचे १२८ कोटी असे मिळून ९२८ . ६५ कोटी रुपयांची तरतूद बेस्टसाठी पालिका अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.