कोर्टाने विचारल्यानंतर आता तरी राज्यपाल विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतील?-नवाब मलिक

राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही-अनिल गलगली

मुंबई,२२मे /प्रतिनिधी :-विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत कॅबिनेटने राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी अजूनही निर्णय घेतलेला नाही. ‘त्या’ कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाने यादी पाठविली असली तरी राज्यपाल सचिवालयाने ती यादी उपलब्ध नसल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या उत्तरात केला आहे.

Image

दरम्यान जनहित याचिकेवर कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व कोर्टाला कळवतील असा विश्वासही ना. नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही फाईल ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार याची वाट पहावी लागणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरून महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे – मलिक

विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा नुकसानाचा अंदाज घेऊन पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरूपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडिंग ऑर्डर व्यतिरिक्त मदत देण्याची राज्य सरकारची भूमिका असेल असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र ते केंद्राकडे आग्रह धरत नाहीत, फक्त राज्य सरकार काय देणार यावर बोलत आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

मोदीजी पाहणीकरता महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र त्यांनी गुजरातला १००० कोटींचे पॅकेज दिले. आता जनता प्रश्न विचारू लागल्यावर ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत. आम्ही भरपाई देणार आहोतच पण आधी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली.