शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी उद्धव बेईमान!-रामदास कदम यांचा गंभीर आरोप

रत्नागिरी ,३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभे आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढून शिवसेना वाढवली. परंतु त्यांच्या मुलाने काय केले? मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांच्या मांडीवर बसले आणि सोनिया गांधींच्या पायाशी बसले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचा गंभार आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळेच बाळासाहेबांची शिवसेना वाचली, असा गौप्यस्फोटही रामदास कदम यांनी केला.

पक्ष फुटला, संपला तरी चालेल, परंतु शरद पवारांना सोडायचे नाही. अजितदादा सकाळी ७ पासून मंत्रालयात बसायचे. तो माणूस मास्टरमाईंड आहे. शरद पवार ६ वाजल्यापासून काम सुरू करतात आणि त्यांनी मंत्रालयात बसून राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवायचा. त्यासाठी १०० आमदार निवडून आणण्याचे राष्ट्रवादीने अडीच वर्षापासून प्रयत्न सुरू केले. हे सर्व आमच्या आमदारांनी अनेकदा सांगितले. पण उद्धव ठाकरे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे हे सगळे आमदार वैतागून भाजपात जाणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळेच ते थांबल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे मराठेद्वेष्टे आहेत. केवळ मराठा नेत्यांचा ते वापर करतात आणि नंतर अडगळीत फेकतात. मराठा माणूस मोठा झालेला त्यांना आवडत नाही. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. ते सामनातून अनेकदा निदर्शनास आले. चार-पाच बडवे सोडले तर बाकीच्या कोणाचेही ते ऐकत नसल्याने आज ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळे आता जिथे जिथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सभा घेतील. तिथे तिथे जाऊन रामदास कदम सभा घेणार. खरे गद्दार कोण, खरे खोकेवाले कोण हे वास्तव लोकांना सांगणार. जिल्हा जिल्ह्यात जाणार. मला ३ वर्ष बोलू दिले नाही. हम करे सो कायदा ही हुकुमशाही, मी मालक बाकी नोकर असा कारभार झाला. बाळासाहेब असताना सगळ्या नेत्यांशी बोलायचे. चर्चा करायचे, त्यानंतर निर्णय घ्यायचे. परंतु आता ते राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

गुहागरमध्ये माझा पराभव करण्यासाठी मातोश्रीतून शिवसेना नेत्याला आदेश देण्यात आले होते. वेळ येईल तेव्हा नाव घेईन. भूकंप होईल. रामदास कदमांना पाडा. मी गाफील राहिलो. शेवटच्या २ दिवसात मला कळालं. मराठ्यांना मोठे होऊ द्यायचं नाही. माझा पराभव झाला. परंतु शिवसेनाप्रमुखांनी मला विधान परिषदेची संधी दिली. त्यांच्या भाषणापेक्षा माझ्या भाषणाला टाळ्या मिळतात. स्वत:ला असुरक्षित समजतात, असा आरोप रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला.

माझ्या मुलाला जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. राष्ट्रवादीच्या विरोधात तो शिवसेनेकडून निवडून आला. परंतु या मतदारसंघातील भगवा झेंडा खाली उतरवण्याचे काम तुम्ही केले. गद्दार तुम्हीच आहात. अनिल परबला पाठवून दापोलीची नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घातली. शरद पवार सांगणार ते हे ऐकणार. उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त ३ वेळा मंत्रालयात आले, ही नोंद गिनीज बुकात झाली. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख आहे. पण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. याची पोलखोल जिल्हा जिल्ह्यात सभा घेऊन रामदास कदम हे करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.