रंगभूमी आणि रंगकर्मीसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही : उद्योग मंत्री उदय सामंत

बीड,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- रंगभूमी तसेच रंगकर्मींसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा नाट‌्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी आज 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट‌्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

स्व. सुहासिनी इर्लेकर रंगमंच येथे उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी श्री सामंत बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री आणि कार्यक्रमाचे उद्घाटक धनंजय मुंडे, नाट्य परिषद, मुंबई चे अध्यक्ष प्रशांत दामले, विश्वस्त मोहन जोशी, आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी निता अंधारे, स्वागताध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, सारिका क्षीरसागर, दिपाताई  क्षीरसागर विजय गोखले, चंद्रकांत कुलकर्णी , अभिनेते संदीप पाठक, अजित भुरे, सतीश लोटके, भाऊसाहेब भोईर, सचिन पाटील मंचावर तर मंचासमोर अनेक नाट‌्य तसेच सिनेसृष्टीचे दिग्गज उपस्थित होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मातीत नाटक संस्कृतीचे रोपटे हे वटवृक्ष झाले आहे. हे वटवृक्ष सदा सर्वदा हिरवेगार असावे त्यासाठी आमच्या कडून आम्ही प्रयत्न करीत आहोत. मुंबई लगत वृद्ध कलाकारांसाठी निशुल्क असे वृद्धा आश्रम बांधले जाईल, जेणे करून कलाकारांचे वृद्धपकाळात गैरसोय होऊ नये याची काळजी शासनातर्फे घेतली जाईल, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.

जागर उपक्रमातंर्गत राज्यभर नाट‌्य स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यातून उद्याचे उत्कृष्ट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक  घडतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 101 वे अखिल भारतीय नाट‌्य संमेलन परीळ वैद्यजनाथ येथे व्हावे, असा मनोदय पालकमंत्री यांनी व्यक्त केल्यावर विश्वस्त बैठकीत याबाबत सकारात्म्क निर्णय घेण्याचे आश्वासक आश्वासन यावेळी श्री सामंत यांनी दिले.

बीड जिल्ह्याने राज्याच्या नाट्य चळवळीत उल्लेखनीय कामगिरी केली : धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याने राज्याच्या नाट्य चळवळीत उल्लेखनीय कामगिरी केले असून अनेक दिग्गज कलाकार या मातीतून आलेले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री आणि नाट‌्य परिषदेचे उद्घाटक धनंजय मुंडे यांनी केली.

ते पुढे म्हणाले,  कलाक्षेत्राच्या विकासासाठी राजश्रय लागतो तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून तो यापुढे ही राहील. बीड जिल्ह्यातील उपलब्ध नाट्य गृहांमध्ये सोयी-सुविधा व नाट्यगृह नसलेल्या ठिकाणी नाट्यगृह उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, याप्रसंगी नमूद केले.  यावेळी राज्यभरातून या संमेलनासाठी आलेले सर्व रंगकर्मी व रसिकांचे स्वागत करून नाट्य संमेलनास श्री मुंडे यांनी  शुभेच्छा दिल्या.

कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात अस्पष्ट  रेष असते :  प्रशांत दामले

कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात अस्पष्ट रेष असते कधी ती पुसली जाते हे कळतच नाही असे भावनिक उदगार ज्येष्ठ नाटक अभिनेते तथा नाट‌्य परिषदेचे अध्यक्ष  प्रशांत दामले यांनी काढले. उत्तम प्रेक्षक तयार करने ही पालकांची जबाबदारी आहे.  नाट्य क्षेत्रात काम करताना पूर्ण वेळ काम करावे, अर्ध वेळ करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मराठवाडाचे प्रेक्षक हे नाटकाचे चाहते आहेत. त्यांनी भरभरून प्रेम दिले असल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी मोहन जोशी यांनी ही मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले तर  कार्याध्यक्ष तथा अध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनीही मनोगत मांडले.