राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे-लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर जि. जळगाव,२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे. उत्तम साहित्य हे चांगला विचार देते, यासाठी ग्रंथवाचन केले पाहिजे, असे आग्रही विचार लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीतील सभामंडप एकमध्ये उद्घाटन करताना सुमित्रा महाजन यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची सर्वांची नावे न घेता ‌‘सभी मेरे अपने’ असे म्हणून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. खान्देशातील मातीला कर्तृत्वाचा सुगंध आहे. पूज्य साने गुरुजी, ना.धों. महानोर यांच्यासारखे कर्तृत्ववान माणसं लाभले आहेत, असेही सुमित्र महाजन यांनी स्पष्ट केले. 

उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य – उद्घाटक सुमित्रा महाजन

संमेलनाच्या उद्घाटक सुमित्रा महाजन म्हणाल्या की, काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना.धो.महानोर, जीवनाचे मर्म आपल्या अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले आहे. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात वागावे कसे याची शिकवणूक मिळते. तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केले जाते. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य मिळतात. तुमचं मन शुध्द असेल तर तुम्ही जीवनात अयशस्वी होऊ शकत नाहीत. पुस्तके जगाला जवळ आणण्याचे काम करतात.