संत शिकवणीतूनच समाज आणि राजकारणाचे काही प्रमाणात शुद्धीकरण शक्य

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर जि. जळगाव,२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-दिव्यदृष्टी विकसीत करण्यासाठी संतांची मुल्ये स्विकारली तर समाज आणि राजकारण पूर्णपणे शुद्ध करणे शक्य नसले तरी, त्याची तिव्रता कमी करता येऊ शकते. असा स्पष्ट सूर राजकीय आणि सामाजिक प्रदुषण यावर संत साहित्य हाच उपाय या परिसंवादातील मान्यवरांच्या चर्चेतून निघाला.

मुख्य सभागृहातील खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी सभामंडपात राजकीय आणि सामाजिक प्रदुषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्ष्ास्थानी अमरावतीचे डॉ. मनोज तायडे हे होते. तर यात ॲड.धनराज वंजारी (मुंबई), डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर) दि.बा. पाटील( वाळवा), इंदूमती सुतार (बिदर), प्रा. चत्रभूज पाटील (धरणगाव) यांनी सहभाग घेतला.

 सहभागी वक्त्यांनी  विविध संतांनी केलेल्या कार्याची आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची महती सांगितली. संतांनी धर्माचा वापर समाज कल्याणासाठी करण्याचे सांगत धर्मभेद, जाती भेद नष्ट करण्याचे व सर्वांनी एकोप्याने राहत समाजाच्या प्रगतीचा मार्ग दाखवला आहे.

 मात्र समाज आणि राजकारणी यांनी या शिकवणाीला वेगळे वळण दिल्याने समाज आणि राजकारण गाढूळ झाल्याचे सर्वांनी मान्य केले. मात्र संत शिकवणीचा अंगिकार केल्यास समाज आणि राजकारणात बदल घडवून आणता येऊ शकतो यावर सर्वांचे एकमत झाले.

संत साहित्याने जातीभेद नष्ट करण्याचे काम केले.अंधश्रद्धेचे खंडण करण्याचे काम केले. आपण संतांना आदराचे स्थान देत असलो तरी आज समाज आणि राजकारण प्रदुषित झाले आहे. कारण समाज आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण निवडणुकीत रेशनच्या कीट वाटणारे नेते सर्वत्र दिसत आहेत. असे चित्र जर असेल तर संतांनी कितीही कीर्तने केली तरी समाज राजकारणी सुधरणार नाहीत. कारण शेकडो वर्षांच्या परंपरेत शैल संप्रदाय, विरशैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांनी समाज कल्याणाच्या, एकोप्याची शिकवण दिली आहे. मात्र वारकरी कितीही प्रामाणिक असला तरी समाज बदलायला तयार नसेल तर राजकारणी समाजाला विकून खातील अशाी भीतीही या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

राजकारणही आता पूर्वीसारखे संवेदनशिल राहिले नाही याचा दाखला देताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी मतदाराला गाडी देऊन रेल्वेने प्रवास केल्याची आणि राजीव गांधी यांनी अटलबिहरी वाजपेयी यांनी आजारपणावर उपचारासाठी विमानाने पाठवल्याची उदाहरणे दिली.परिसंवादाचे सुत्रसंचालन डॉ. प्रभाकर जोशी यांनी केले.